सिंधुदुर्ग : चक्रीवादळामुळे समुद्रात मासेमारी करताना भरकटलेले ९५२ मच्छिमार सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर सुरक्षित पोहोचल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. ट्विटद्वारे त्यांनी ही माहिती दिली.
चक्रीवादळात बेपत्ता झालेल्या सर्व ६८ बोटींपैकी केरळच्या ६६ आणि तामिळनाडूच्या २ बोटींचा यात समावेश आहे.
या सर्व बोटींमध्ये मिळून ९५२ मच्छिमार सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर सुखरुप पोहोचले आहेत.
या सर्व मच्छिमारांची योग्य काळजी घेण्याचे आदेश महाराष्ट्र मरिटाईम बोर्ड आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
स्थानिक प्रशासन त्यांच्या सेवेसाठी कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
भरकटलेल्या या मच्छिमारांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने उचललेल्या पावलांबद्दल संरक्षणमंत्री निर्मला सितारामण यांनी त्यांचे आभार मानलेत.
हे मच्छिमार कोलकाता, केरळ आणि तामिळनाडू येथील रहिवासी आहेत. त्यांनी देखील ट्विट करुन मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
हजार मच्छिमार समुद्रात अडकलेल्या बातम्या खोट्या असून ९७ मच्छिमार चक्रिवादळात अडकल्याचे संरक्षणमंत्री सितारामण यांनी सांगितले आहे.
यांपैकी तामिळनाडूच्या ७१ जणांना वाचवण्यात यश आले आहे.
इतर लोकांनाही वाचवण्यासाठी तटरक्षकदल युद्धपातळीवर काम करीत असून लवकरात लवकर त्यांचाही शोध लागेल आणि आपल्याला आनंदाची बातमी मिळेल असेही सितारामण यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.