दुचाकीस्वार तरुणाला फरफटत ओढून नेत ठार करणारा बिबट्या जेरबंद

बिबट्याला वनविभागाने जेरबंद केल्याने परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला

Updated: Jun 7, 2021, 11:23 AM IST
दुचाकीस्वार तरुणाला फरफटत ओढून नेत ठार करणारा बिबट्या जेरबंद title=

निलेश वाघ ,झी २४ तास ,सटाणा : सटाण्याच्या पिसोळबारीमध्ये मोटार सायकलवरून जाणाऱ्या तरुण शेतकऱ्यांवर बिबट्याने झडप घातली. झडप घालून तरूणाला फरफटत जंगलात ओढून नेत शरीराचे लचके तोडले होते. या बिबट्याला वनविभागाने जेरबंद केल्याने परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

सटाणा तालुक्यातील दरेगाव येथील तरुण शेतकरी नंदकिशोर पवार मोटरसायकलवरून अंडे आणण्यासाठी  गेला होता. यावेळी त्यांच्यावर पिसोळबारीमध्ये बिबट्याने हल्ला चढवून डोंगरावर फरफटत ओढून नेले. बिबट्याने डोंगरावर शरीराचे अक्षरशः लचके तोडत ठार केले होते. घरी न परतल्याने यांच्या कटुंबियांनी शोध मोहीम राबविली असता पिसोळबारीमध्ये त्याची मोटार सायकल बेवारस अवस्थेत आढळून आली. शेजारच्याच डोंगरावर त्याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आल्याने परिसर हादरून गेला होता.

या घटनेनंतर  पिंपळनेर व ताहाराबाद वनपरिक्षेत्र हद्दीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पिसोळबारीत दोन ठिकाणी पिंजरे लावले असता पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. नंदकिशोर पवार हे आपल्या कुटुंबियांसह नांदीन परिसरात वास्तव्यास होते. शुक्रवारी सायंकाळी उशिरा दुचाकीने पिसोळबारीमार्गे दिघावे येथे अंडी आणि काही वस्तू घेण्यासाठी गेले होते. खरेदी करून घराकडे परतत असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यानंतर 100 फुटावरून खोल दाट झाडीत ओढत बिबट्या त्यांना घेऊन गेला. 

सटाणा तालुक्यातील पश्चिम पट्ट्यासह मोसम ,करंजाडी व काटवन परिसरातून मोठे जंगले असल्याने या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे.नागरी वस्ती वाढल्याने बिबट्यांचा नागरी वस्तीकडे वावर वाढला असून जनावरांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडण्याचे प्रकार वाढत आहे . तर नागरिकांवरही हल्ला करून जखमी केल्याच्या घटना समोर आल्या आहे. आता तर बिबटे माणसावर हल्ला चढवून त्यांच्या शरीराचे लचके  तोडत असल्याने परिसरातील नागरिकांत घबराट पसरली आहे.