इमारत कोसळून गाडला गेला, पाहा देवाचा चमत्कार, सुटकेचा थरार

Bhiwandi Building Collapse: ठाण्यातील (Thane) भिवंडी (Bhiwandi) येथे दोन मजली इमारत कोसळून चौघांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी अद्यापही बचावकार्य सुरु असून, तब्बल 18 तासांनी एका व्यक्तीची सुटका करण्यात आली आहे.   

शिवराज यादव | Updated: May 1, 2023, 07:33 PM IST
इमारत कोसळून गाडला गेला, पाहा देवाचा चमत्कार, सुटकेचा थरार  title=

Bhiwandi Building Collapse: ठाण्यातील (Thane) भिवंडी (Bhiwandi) येथे दोन मजली गोडाऊन कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर अद्यापही बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत चौघं ठार झाले असून, काहीजण अद्यापही खाली दबल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, दुर्घटनेच्या 19 तासानंतरही घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. यादरम्यान एका 38 वर्षीय व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं आहे. तब्बल 18 तास ही व्यक्ती खाली मलब्याखाली दबली गेली होती.

सुनील पिसा असं या 38 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. राष्ट्रीय आपत्ती आणि ठाणे आपत्ती दलाने त्यांची मलब्यातून सुटका केली आहे. त्याला भिवंडी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अशी माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी दिली आहे. 

ठाणे पालिकेने सुनील यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढलं जात असतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत बाहेर काढल्यानंतर ते रडताना दिसत आहेत. तसंच यावेळी एनडीआरएफ आणि टीडीआरएफ पथकाचे कर्मचारी तात्काळ त्यांना ऑक्सिजन पुरवण्याची व्यवस्था करताना दिसत आहे. दरम्यान स्ट्रेचरवर झोपलेले असतानाही ते हात जोडून आपल्याला वाचल्याबद्दल कर्मचाऱ्यांचे आभार मानताना दिसत आहेत. 

दरम्यान भिवंडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा 4 वर गेला आहे. "ठाण्यातील भिवंडी येथे इमारत कोसळून मृत्यू झालेल्यांचा आकडा 4 वर गेला आहे. अद्यापही बचावकार्य सुरु आहे," अशी माहिती ठाणे महापालिकेने दिली आहे. 

मलब्याखाली अजून नऊ लोक अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे अग्निशमन दल, पोलीस आणि एनडीआरएफचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असून बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत 12 लोक जखमी झाले आहेत. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. शनिवारी रात्री त्यांनी भिवंडीमधील आयजीएम रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. मृतांच्या नातेवाईकांना त्यांनी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींच्या उपचारांचा खर्च राज्य सरकार करणार असल्याचं जाहीर केलं आहे. याशिवाय त्यांनी बचावकार्यात सहभागी सर्व यंत्रणांना योग्य समन्वय ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

इमारतीच्या मालकाविरोधात गुन्हा

याप्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. मात्र इमारतीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.