अल्पवयीन मुलाला खाऊ घातली कबुतराची विष्ठा, पुण्यात 3 जणांना अटक

Pune Crime News: ३ जणांच्या टोळक्याने अल्पवयीन मुलाला खाऊ घातली कबुतराची विष्टा. पुण्यातल्या या प्रकाराने उडाली एकच खळबळ

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 27, 2023, 01:16 PM IST
अल्पवयीन मुलाला खाऊ घातली कबुतराची विष्ठा, पुण्यात 3 जणांना अटक title=
a minor child was force to eat pigeon excrement in pune

सागर आव्हाड, झी मीडिया

Pune News Today:  पुण्यात (Pune)  एक घृणास्पद प्रकार समोर आला आहे. 3 जणांच्या टोळक्याने अल्पवयीन मुलाला कबुतराची विष्ठा खाऊ घातली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील कात्रज भागात हा अमानुष प्रकार घडला आहे. या प्रकाराने परिसरात एकच संताप व्यक्त होत आहे. 

वडिलांनी दिली तक्रार

अल्पवयीन मुलांनी कबुतर चोरल्याचा आरोप करत आरोपींनी हत्यार फिरवत परिसरात दहशत माजवली आहे. तसंच, त्याच मुलाला त्याच कबुतराची विष्टा खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

तीन जणांना अटक

गणेश दोडमणी, ओम पंडित, अमोल आदम या तरुणांवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील कात्रज भागात २५ जुलै रोजी ही घटना घडली. 

कबुतर चोरल्याची दिली शिक्षा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाने आरोपींच्या जागेवरून कबुतर चोरले होते. याचा राग आरोपींच्या मनात होता. या मुलाचा शोध घेण्याचे त्यांनी ठरवले. आरोपींनी या अल्पवयीन मुलाचा शोध घेण्यासाठी कात्रज भागात हत्यारे घेऊन दहशतदेखील माजवली होती. तसंच,  "कोणी मध्ये आले तर एका एकाला तोडून टाकेल" अशी धमकी देत या तरुणांनी परिसरात हैदोस घातला होता. अल्पवयीन मुलाला शोधून काढल्यानंतर आरोपींने त्याला गाडीत बसवून एका निर्जनठिकाणी नेले. तसंच, तिथे गेल्यावर त्याला त्या ठिकाणी कबुतराची विष्टा खाऊ घातल्याचा संतापजनक प्रखार घडला आहे. 

अल्पवयीन मुलाला दिली धमकी

अल्पवयीन मुलासोबत घृणास्पद प्रकार केल्यानंतर आरोपींनी त्याला धमकीही दिली. जर हे कोणाला सांगितलं तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी या आरोपींनी त्याला दिली. त्यामुळं अल्पवयीन मुलगा धास्तावलेला होता. घरी गेल्यानंतरही तो शांत शांतच होता. त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला विश्वासात घेत काय घडलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने घडलेला सगळा प्रकार आपल्या वडिलांना येऊन सांगितला. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.