झी मिडिया, अनिरुद्ध दवाळे, अमरावती : मेळघाटमधील धारणी पोलीस स्टेशन अंतर्गत आठ किलोमीटर अंतरावरील कळमखार गावातील रहिवाशी रामू गायकवाड ३५ वर्षाच्या तरुणाने आपल्या राहत्या घरी जिलेटीच्या कांड्यांचा स्फोट करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
रामू गायकवाड हा मजूरी करायचा, पत्नीसोबत वाद झाला त्यानंतर पत्नी आई-वडिलांच्या घरात राहत होती. मधू रात्री घरात एकटाच झोपला होता त्यानंतर त्याने जिलेटीन कांड्या गळ्यात बांधल्या आणि स्फोट करत आत्महत्या केली आहे. मोठा आवाज झाल्याने बाजूचे लोक धावत आले तेव्हा पाहिलं तर त्याच्या शरीराचे तुकडे आजूबाजूला दिसले.
घटनेची माहिती धारणी पोलिसांना देण्यात आल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
दरम्यान, या पूर्वीही धारणी तालुक्यातील ब्लास्टिंगच्या स्फोटामुळे माशांची शिकार करताना परिसरातील अनेकांना आपले हात गमवावे लागले आहेत. त्यामुळे ब्लास्टिंगचे जिलेटीन कुठून येतं?, त्याची विक्री कोण करतं?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याची सखोल तपास करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. त्यामुळे आता यातून काय खुलासा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.