मराठा-ओबीसी वादावर एकच तोडगा? मराठ्यांना ओबीसीत घ्या, जरांगेंचा भुजबळांवर निशाणा

बिहारपाठोपाठ महाराष्ट्रात आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी होऊ लागलीय. त्यावरुन जरांगे आणि भुजबळांमध्ये पुन्हा जुंपली आहे. 

Updated: Nov 10, 2023, 10:36 PM IST
मराठा-ओबीसी वादावर एकच तोडगा? मराठ्यांना ओबीसीत घ्या, जरांगेंचा भुजबळांवर निशाणा   title=

Maratha OBC Reservation : बिहारमध्ये जातनिहाय जनगणना झाली आणि पाठोपाठ मुख्यमंत्री नितीश कुमारांनी आरक्षण मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव मांडला. बिहारपाठोपाठ राज्यातही ७५ टक्के आरक्षण द्या, अशी जोरदार मागणी आता राज्यात सुरू झाली आहे. त्यावरुन महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. 

बिहारमध्ये 75 टक्के आरक्षण?

SCचं सध्याचं 16% आरक्षण वाढून 20% होण्याची शक्यता आहे.STचं सध्याचं 1% आरक्षण वाढून 2% करण्याचा प्रस्ताव आहे. EBC आणि OBC मिळून 43 % आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. EWS साठी 10 टक्के आरक्षण कायम असेल अस प्रस्तावित आहे.

बिहारप्रमाणेच राज्यातही 75 टक्के आरक्षण द्या, आणि मराठा-ओबीसी वाद संपवून टाका

बिहारप्रमाणेच राज्यातही 75 टक्के आरक्षण द्या, आणि मराठा-ओबीसी वाद संपवून टाका, अशी मागणी भुजबळांनी केलीय.  भुजबळांनी मागणी करताच जरांगेंनी पुन्हा भुजबळांवर निशाणा साधलाय. मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करा, त्या नंतर हवं तेवढं आरक्षण वाढवा, असं जरांगेंनी म्हटलंय.  एवढंच नाही तर  काही जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या व्यतिरीक्त इतर समाजातील नागरिकांच्याही कागदपत्रांवरही कुणबी नोंदी आढळल्या आहेत. त्यावरुन जरांगेंनी भुजबळांना टोला लगावलाय. 
आरक्षणावरुन रान पेटलेलं असताना मराठा विरुद्ध ओबीसी अशा कचाट्यात सरकार सापडलंय. 

मराठ्यांना सरसकट आरक्षण द्यायचं असेल तर आरक्षणाचा कोटा वाढवण्याचा पर्याय आहे. मात्र, त्याआधी जातीय जनगणना होणं आवश्यक आहे. त्याला अर्थातच वेळ लागणार आहे.  एकीकडे जरांगे सरकारला सतत अल्टिमेटम आणि इशारे देतायत तर दुसरीकडे ओबीसी आक्रमक झालेत. यातून टिकणा-या आरक्षणाची कसरत सरकारला करायची आहे. 

जरांगे विरुद्ध वडेट्टीवार वादाचा भडका मराठा आरक्षण राजकारणासाठी?

आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी सामना सुरू झालाय.. मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांकडून जोरदार विरोध होतोय... मराठ्यांनी ओबीसीऐवजी EWS मधून म्हणजे आर्थिक मागास प्रवर्गातून आरक्षण घेतल्यास ते फायदेशीर ठरेल, असा सल्ला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी दिलाय. जरांगेंना राजकीय फायद्यासाठी आरक्षण हवंय, असा घणाघाती आरोपही वडेट्टीवारांनी केला.. तर वडेट्टीवारांच्या मनात मराठ्यांबद्दल द्वेष दिसतो. त्यामुळं तुमच्या सल्ल्याची गरज नाही, असा पलटवार जरांगेंनी केला. आधी अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर टीका केली. आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही जरांगेंवर निशाणा साधला आहे.