उस्मानाबाद : लहान मुलांचे आधार कार्ड काढण्यास अडचणी येतात, असं सुरूवातीला दिसून आलं होतं. साधारण ४ ते ५ वर्ष होईपर्यंत हाताचे ठसे व्यवस्थित उमटत नसल्याने आधार कार्ड तयार होण्यास अडचणी येत असल्याचं सांगण्यात येत होतं, मात्र आता उस्मानाबाद जिल्ह्यातील एका मुलीला जन्म झाल्यानंतर अवघ्या ६ मिनिटांनी आधार क्रमांकांची नोंदणी करण्यात आली आहे. तिच्या आईवडिलांनी या बाबतीत पुढाकार आणि सजगता दाखवल्याने, हे शक्य झालं असल्याचं सांगण्यात येत आहे.
तुम्ही तुमचे आधार कार्ड काढले आहे का? नसेल तर या मुलीचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा आणि तातडीने आधार कार्ड काढा. भावना संतोष जाधव या मुलीचा जन्म महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील एका रूग्णालयात आज (रविवार) दुपारी १२ वाजून ३ मिनिटांनी झाला. त्यानंतर १२ वाजून ९ मिनिटांनी तिला आधार क्रमांक मिळाला. होय जन्म झाल्यानंतर अवघ्या ६ मिनिटात तिला तिचा आधार नंबर मिळाला आहे. तिच्या आई वडिलांनी याबाबत सजगता दाखवल्याने हे शक्य झाले आहे.
भावना संतोष जाधव असं या मुलीचं नाव आहे, तिच्या आईवडिलांनी आधारकार्डसाठी तिची नोंदणी केली, यानंतर तिला जन्माचा दाखला आणि आधारनंबर मिळाला. युनिक आयडेंटीफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)तर्फे तातडीने तिच्या जन्माची नोंद करण्यात आली, अशी माहिती उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिली. लवकरच आम्ही सगळ्या लहान मुलांचे आधार क्रमांक त्यांच्या आई वडिलांच्या आधार क्रमांकाशी जोडले जाणार आहेत.