सामूहिक विवाह सोहळ्यात या आमदाराच्या मुलीचा 'शाही' विवाह!

अशा प्रकारे लग्न लावल्याने वेगळाच आनंद मिळत असल्याची भावना अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलीय.  

Updated: Apr 24, 2018, 10:37 AM IST

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : नेत्यांच्या घरची लग्नं म्हणजे, भरमसाठ खर्च, खूप दिखावा आणि शाही थाट... मात्र, औरंगाबादचा एक राजकारणी याला अपवाद आहे... त्यांनी दिलेला धडा इतरांसाठी झणझणीत अंजन ठरलाय. लग्नाच्या नावानं होणारा वारेमाप खर्च आपण सगळेच पाहतो.. त्यात नेते आणि राजकारण्याच्या मुला-मुलींचे लग्न जणू काही शाही सोहळाच असतो. मात्र औरंगाबादमध्ये रंगलेला एक लग्न सोहळा याला अपवाद ठरलाय. औरंगाबादचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी मुलीच्या लग्नासह थेट सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केलं. यावेळी एक दोन नाही तर 555 जोडपी रेशीमगाठीत अडकली. सत्तार यांची लेक आणि जावयानंही मोठ्या आनंदाने वडिलांचा हा प्रस्ताव मान्य केला. 
 
याआधी सत्तार यांनी आपल्या मोठ्या मुलाचा विवाहसुद्धा याच पद्धतीने लावला होता. अशा प्रकारे लग्न लावल्याने वेगळाच आनंद मिळत असल्याची भावना अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलीय.  

मराठवाड्यासारख्या भागात सामूहिक विवाहांच वाढतं प्रस्थ निश्चितच कौतुकास्पद आहे. यातून अनेक निराधारांना मोठा आधार मिळालाय.. त्यात राजकारण्यांचे कुटुंबही याच पद्धतीनं लग्न करायला लागले तर निश्चितच एक चांगला संदेश समाजात जातो. त्यामुळे शाही पद्धतीने पैशाची उधळपट्टी लग्नसोहळे करणाऱ्यांनी हा विवाहसोहळा नक्कीच पाहावा.