प्रथमेश तावडे, वसई : वसईत एका कोरोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी नेत असताना वसई-विरार महापालिकेच्या रुग्णवाहिकेला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. वसई पश्चिमेकडील पापडी येथील स्टेटस हॉटेलसमोर हा अपघात घडला. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नालासोपारा येथील कोरोनाबाधित रुग्णावर उपचारासाठी वसईच्या जी.जी कॉलेज येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी वसई महापालिकेची रुग्णवाहिका निघाली होती. आज दुपारी चार वाजताच्या सुमारास पापडी येथील स्टेटस हॉटेलपर्यंत पोहचताना या रुग्णवाहिकेचा एक्सेल निघाला व रुग्णवाहिका रस्त्यावरील खांबाला जावून ठोकली. या रुग्णवाहिकेत एकच रुग्ण होता. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र रुग्णवाहिकेचे मोठे नुकसान झाले आहे.
तात्काळ ड्रायव्हरने दुसरी ॲम्बुलन्स बोलावून रुग्णाला कोविड सेंटरमध्ये पाठवले. या घटनेनंतर महापालिकेच्या रुग्णवाहिकेच्या डागडुजीचा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.