रत्नागिरी जिल्ह्यात सात कोरोनाबाधित रुग्णांची भर, आकडा १३२ वर

रत्नागिरी जिल्ह्यात आणखी  सात कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे.  

Updated: May 23, 2020, 08:27 AM IST
रत्नागिरी जिल्ह्यात सात कोरोनाबाधित रुग्णांची भर, आकडा १३२ वर
संग्रहित छाया

रत्नागिरी : जिल्ह्यात आणखी  सात कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. मिरज येथून आलेल्या कोरोना संशयितांच्या अहवालांपैकी सात अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ४५५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये गुहागर तालुक्यात दोन, दापोली तालुक्यात दोन, रत्नागिरी तालुक्यात दोन आणि संगमेश्वर तालुक्यात एक असा रुग्णांचा समावेश आहे. 

रत्नागिरी तालुक्यात सापडलेले रुग्ण १७ तारखेला मुंबईहून आले होते. जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३२ झाली आहे. उपचारानंतर घरी सोडलेल्यांची संख्या ३७ तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या चार आहे.

कोरोनाचा फैलाव वाढू लागल्याने जिल्ह्यातील नागरिकांची चिंता वाढू लागली आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होऊ लागला आहे. गेल्या आठवडाभरात कोरोना बाधितांचा आकडा वाढला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. असे असताना कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे.

रेड झोन असणाऱ्या मुंबई आणि उपनगरातून  कोकणमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तसतसा कोरोना बाधितांचा आकडा वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे. कोरोना बाधितांचा आकडा १५० च्या दिशेने वाढचाल करत असल्याचे दिसून येत आहे.