मुंबई : 'वेदांता' (Vedanta) आणि 'फॉक्सकॉन' (foxconn) यांच्या भागीदारीतून महाराष्ट्रात येऊ घातलेली 1 लाख 66 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक गुजरातमध्ये गेल्याने राज्यात राजकारण तापलं आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर (shinde fadanvis government) विरोधकांकडून टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे (shivsena) तळेगावात आंदोलन करण्यात येत आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी खोके सरकारमुळे वेदांता प्रकल्प गेला असं म्हटलं आहे.
"महाराष्ट्रात रोजगार येणार की नाही असा प्रश्न पडला आहे. याबद्दल आक्रोश तरुणांमध्ये दिसतो आहे. दोन आठवड्यापूर्वी मी एक ट्विट केला होता त्यामध्ये वेदांचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी सांगितलं की आम्ही गुजरातला चाललो आहोत. तिथे आम्हाला जागा मिळाल्याचं त्यांनी म्हटलं. मला प्रकल्प गुजरातमध्ये गेला याचं दुखः नाही. आपण आपल्या मेरिटच्या जोरावर इथे रोजगार खेचून आणला आहे," असे आदित्य ठाकरे म्हणाले. (Aditya Thackeray says Vedanta project lost because of shinde fadanvis government)
जिथे पाणी वीज नाही तिथे हा प्रकल्प गेलाच कसा?
"जो प्रकल्प 100 टक्के महाराष्ट्रात येणार होतो तो सरकार बदलल्या नंतर तुम्ही पळवला कसा? आमचे 40 आमदार पळवून नेले तस गुजरातवरुन वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुवाहाटीला नेणार आहात का? जानेवारीमध्ये झूम कॉलवर आम्ही अनिल अग्रवाल यांच्यासोबत बैठक घेतली होती. मे मध्ये डावोसमध्येही बैठक झाली. तळेगावमध्ये या प्रकल्पाला जागा देणार होतो. तरीही जिथे पाणी नाही, वीज नाही तिथे हा प्रकल्प गेलाच कसा? महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार, खोके सरकार बनल्याचं गुजरातच्या उद्योगमंत्र्यांनी पाहिलं आणि त्यांनी इकडे येणारा उद्योग गुजरातला नेला," असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
खोके सरकारच्या नाकर्तेपणामुळे प्रकल्प गेला
"खोके सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकल्प गेला. ज्या प्रकल्पाला आपण सगळ्या सवलती देत होतो. सर्व सोई सुविधा असताना मुख्यमंत्र्यांना वेदांता फॉक्सकॉन कोण आहे आणि कुठून आला आणि कधी गेला हे माहितचं नव्हतं. मला थोडं विचारलं असतं तर मी सांगितलं असतं त्यांच्याकडेपण 50 खोके पोहोचवा आणि एकदम ओके करा," असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.