नागपूर : इयत्ता पहिलीच्या प्रवेशाचे वय हे सहाच रहाणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं आहे. प्रवेशाचे वय ६ वरून वय वर्षे ५ करण्याचा शासनाचा कोणातही विचार नसल्याचं शिक्षणमंत्र्यानी यावेळी स्पष्ट केलं. इयत्ता पहिलीत वय वर्षे ६ ऐवजी वय वर्षे ५ असलेल्या पाल्यांना प्रवेश देण्याची मागणी आज विधानपरिषदमध्ये अल्पकालीन चर्चेद्वारे करण्यात आली.
आमदार दत्तात्रय सावंत यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. जर पहिलीच्या प्रवेशाचे वय वर्षे ५ केले तर भविष्यात विद्यार्थ्यांना अनेक स्पर्धा परीक्षांना तोंड देण्यासाठी जादा संधी उपलब्ध होईल, पाल्याच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने हे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. देशांत अनेक राज्यात पहिलीच्या प्रवेशाचे वय हे ५ आहे. असं असतांना राज्यात का अट्टहास केला जातोय असा मुद्दा उपस्थित करण्यात आला.