Anjali Damania on Ajit Pawar: अजित पवार आणि अंजली दमानिया वादाच्या दुस-या अंकाला सुरुवात झालीय. गेल्या काही दिवसांपासून दमानिया आणि अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगलाय. आता अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी दमानियांना परदेश दौऱ्यावरून लक्ष्य केलंय. विदेश दौऱ्यासाठी दमानियांना स्पॉन्सरशिप कुठून मिळते, असा सवाल करत सूरज चव्हाण यांनी थेट दमानियांना उत्पन्नाचा स्त्रोत विचारला.
या आरोपांवरून भडकलेल्या अंजली दमानिया यांनी थेट अजित पवारांनाच आव्हान दिलंय. मी प्राप्तीकर परताव्याच्या प्रती घेऊन मुंबईला यायला तयार आहे. अजित पवारांनी त्यांचे डिटेल्स आणावेत, असं खुलं चॅलेंज देऊन दमानियांनी राष्ट्रवादीवरच पलटवार केलाय.
अजित पवारांवर आरोप करण्याची अंजली दमानियांची ही पहिलीच वेळ नाहीय. काही दिवसांपूर्वी पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणावरूनही दमानियांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केला होता. अपघातातील आरोपींना वाचवण्यासाठी अजित पवारांनी मदत केली. त्यामुळं त्यांच्या थेट नार्को टेस्टची मागणी करून दमानियांनी खळबळ उडवून दिली होती. त्यावर अजित पवारांनी आरोप सिद्ध झाल्यास राजकीय संन्यास घेण्याची भाषा केली होती. आता पुन्हा एकदा दमानियांनी अजित पवारांना त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत खुला करण्याचं चॅलेंज दिलंय. दमानियांचा हा नवीन वार अजित पवार गटाकडून कसा परतवला जातो, हे पाहणं महत्त्वाचंय.
अंजली दमानियांनी आता थेट अजित पवारांनाच आव्हान दिलंय. 17 तारखेला मुंबईत येत आहे. 3 वर्षांच्या प्राप्तीकर परताव्याच्या प्रती घेऊन येते. अजित पवारांनी त्यांचे डिटेल्स आणावेत, असं आव्हान दमानियांनी दिलीय. तर अजित पवारांना एवढंच काम नाही, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेलांनी दिलीय.