Maharashtra Government Job Age Limit: महाराष्ट्र शासनामधील सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांसाठी राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी नोकरीसाठीची वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे. 2 वर्षांनी वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे. कोरोनामुळे एक वर्ष वाया गेल्याने शासनाने हा निर्णय घेतला आहे. शासनाच्या विविध विभागात सरळसेवा भरती प्रक्रियेतून जाणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 31 डिसेंबर 2023 पर्यंत 2 वर्ष वाढवून देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील परिपत्रक जारी केलं आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने राज्य शासनातील विविध विभागात 75 हजार नोकर भरतीची घोषणा सरकारने केली होती. त्या नोकरभरतीत हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे. खुल्या प्रवर्गाची कमाल वयोमर्यादा यामुळे 38 ऐवजी 40 वर्ष होणार आहे तर मागास प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 43 ऐवजी 45 वर्षे होईल. वयोमर्यादेतील ही सूट 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू राहणार आहे. अनेक ठिकाणी कोरोनाच्या संकटामुळे नोकरभरती झाली नव्हती. त्यामुळे वयोमर्यादेसंदर्भातील अडचणी अनेक उमेदवारांना निर्माण झाल्या होत्या. याच कारणामुळे वयोमर्यादा वाढवण्याची मागणी सातत्याने केली जात होती. ही मागणी आता सरकारने मान्य केली असून एक आदेशच जारी केला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उप सचिव गीता कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीसहीत प्रशासनाच्यावतीने हे परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. या परिपत्रकामध्ये, "स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्य शासनाने 75 हजार पदभरतीची प्रक्रीया सुरु करण्याचे घोषित केले आहे. यासाठी पदभरतीवरील निर्बंध काही कालावधीसाठी शिथिल करण्यात आले आहेत. नव्या सवलतीनुसार भरती प्रक्रीया राबवली जाणार आहे. वेगवेगळ्या कारणामुळे उदाहरणार्थ कोरोना, सदोष माणगीपत्रे आणि मागणीपत्रं न पाठवण्यासारख्या कारणामुळे, पुरेशा जाहिराती प्रसिद्ध न झाल्याने ज्या उमेदवारांना परीक्षांना बसण्याची संधी प्राप्त झालेली नाही आणि त्यांची कमाल वयोमर्यादा संपुष्टात आली आहे अशा उमेदवारांनी परीक्षांना बसण्याची संधी प्राप्त व्हावी म्हणून हा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाने कमाल वयोमर्यादेमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे," असं नमूद करण्यात आलं आहे.
"31 डिसेंबर 2023 पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी दिनांक 24 एप्रिल 2016 च्या सासन निर्णयात विहीत केलेल्या कमाल वयोमर्दायदेत (खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्षे) दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आली आहे," असं या आदेशात म्हटलं आहे.