बदलापुरात भव्य आगरी महोत्सवाचं आयोजन

डोंबिवलीप्रमाणेच ठाण्यानजिकच्या बदलापुरातही पहिल्यांदाच तीन दिवसीय भव्य आगरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. 

Updated: May 20, 2018, 11:51 AM IST
बदलापुरात भव्य आगरी महोत्सवाचं आयोजन title=

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर : डोंबिवलीप्रमाणेच ठाण्यानजिकच्या बदलापुरातही पहिल्यांदाच तीन दिवसीय भव्य आगरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. क्रीडा संकुल मैदानावर आयोजित या महोत्सवातून  खास आगरी पद्धतीच्या झणझणीत खाद्यपदार्थांसह, आगरी संस्कृतीचं दर्शनही बदलापूरकरांना घडवलं जात आहे. मटण रस्सा, तळलेलं पापलेट, सुका जवळा, कोंबडीवडे आणि सोबत तांदळाची भाकरी. असा अस्सल आगरी पद्धतीचा बेत आणि सोबतीला आगरी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असा दुहेरी योग, बदलापूरकरांना अनुभवायला मिळाला. 

आगरी समाजाचं पारंपरिक राहणीमान दर्शवणारं घर हे या आगरी महोत्सवाचं प्रमुख आकर्षण ठरलंय. २० तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. 

आगरी समाजातल्या लग्नात हळदी समारंभावर वारेमाप खर्च होतो. हा अनाठायी खर्च टाळून, समाजातल्या गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर ही रक्कम खर्च करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं.