अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या कळस पिंपरी गावात एका आदिवासी शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. गायरान जमीनवर शेती करण्याच्या वादातून ही हत्या झाल्याचा मृत इसमाच्या कुटुंबियांचा आरोप आहे. कळस-पिंपरीतल्या गायरान जमीन पवार कुटुंबिय वर्षनुवर्ष शेती करतात.
ही शेती ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना मान्य नव्हती. मंगळवारी दुपारी ग्रामपंचायतीचे कर्मचारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं गायरान जमीनजवळ एकत्र आले. जमिनीवर पिकवलेली शेती उद्धवस्त करण्यासाठी जेसीबी देखील आणण्यात आला.
पवार कुटुंबानं विरोध केल्यावर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. याच मारहाणीत कंस पवार गंभीर जखमी झाले. कंस पवारांना उपचार मिळू नये अशी स्थिती निर्माण करण्यात आली. उलट पवार कुटुंबाच्या विरोधात तक्रार दाखलवण्यासाठी पोलीस ठाण्यात जमाव एकवटला.
वेळीच उपचार न मिळाल्यानं कंस पवारांचा बुधवारी मृत्यू झाला. आता सरपंच बद्रीनाथ येडे आणि ग्रामस्थावर खुनाचा गुन्हा दाखल करावा आणि आरोपीना तात्काळ अटक करावी अशी मागणी त्यांनी केलीयं.