मोदींविरोधात व्हॉट्सअॅप पोस्ट टाकल्याने पोलीस निलंबित

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारी पोस्ट व्हॉट्सअॅपवर पोस्ट केल्याने एका पोलिसाला निलंबित करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

Updated: Oct 16, 2017, 04:59 PM IST
मोदींविरोधात व्हॉट्सअॅप पोस्ट टाकल्याने पोलीस निलंबित title=

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारी पोस्ट व्हॉट्सअॅपवर पोस्ट केल्याने एका पोलिसाला निलंबित करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

अहमदनगरमध्ये ही घटना घडली आहे. रमेश शिंदे असं निलंबित करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचं नाव आहे. सध्या काँग्रेसचे नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे अंगरक्षक म्हणून ते काम करतात.

रमेश शिंदे हे संगमनेरमधील एका वॉटसअॅप ग्रुपचे सदस्य आहेत. दहा दिवसांपूर्वी त्यांनी कट्टप्पाच्या फोटोवर मोदींचा फोटो लावून आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्याच ग्रुपमधील सदस्य असलेल्या भाजप युवा मोर्चा तालुका उपाध्यक्षानं याप्रकणी संगमनेर पोलीस ठाण्यात तक्रार केली.

यासंदर्भात जिल्हा सायबर सेलकडून सखोल चौकशी करण्यात आली. त्यानंतर रमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, पोलीस कर्मचा-याच्या या निलंबनावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. ही हिटलरशाही असून, पंतप्रधान मोदींनी अघोषित आणिबाणी लादली असल्याची टीका काँग्रेस-राष्ट्रवादीने केली आहे.