'...तर टायरमध्ये घ्या!' संतापलेल्या अजित पवारांचा सल्ला; म्हणाले, 'आम्ही कोणताही...'

Ajit Pawar Angry: अजित पवार आज पुण्यामधील आळंदीच्या दौऱ्यावर असून ते ठिकठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. अशाच एका छोटेखानी जाहीर भाषणामध्ये त्यांनी संताप व्यक्त केला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 12, 2024, 01:44 PM IST
'...तर टायरमध्ये घ्या!' संतापलेल्या अजित पवारांचा सल्ला; म्हणाले, 'आम्ही कोणताही...' title=
अजित पवारांचं जाहीर ठिकाणी विधान (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य- अजित पवारांच्या एक्स अकाऊंटवरुन साभार)

Ajit Pawar Angry: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज खेड आणि आळंदीच्या दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असून ठिकठिकाणी संवाद साधत आहेत. अजित पवार यांनी आपल्या एका छोटेखानी भाषणादरम्यान खेळ-आळंदीला मंत्रीपद देण्याचा शब्द येथील नागरिकांना दिला. "महायुतीच्या जागावाटपात खेड-आळंदीची जागा राष्ट्रवादीला सुटली तर पुन्हा एकदा दिलीप मोहिते पाटलांना निवडून द्या. ग्रामपंचायत ते आमदारापर्यंत गाडी पोहचली आहे. आता लाल दिव्यापर्यंत गाडी पोहचवण्यासाठी साथ द्या," असं आवाहन अजित पवारांनी केलं. विशेष म्हणजे यावेळेस अजित पवार यांनी देवाच्या आळंदीत मंदिरात जाऊन पाया न पडता बाहेरुन दर्शन घेतलं. यावेळेस या भागातील गुन्हेगारीबद्दल अजित पवारांनी चिंता व्यक्त केली.

हा कोण लागून गेला?

देवाच्या आळंदीमधील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात अजित पवारांनी चिंता व्यक्त केली. "देवाच्या आळंदीत चुकीचे धंदे चालत आहेत. इथे वेडे-वाकडे प्रकार होतात. आपण इथं नतमस्तक झाल्याशिवाय पुढं जात नाही. मागे आलो तेव्हा 2 तास दर्शन रांग थांबवावी लागली होती. लोकं म्हणतील हा कोण लागून गेला? जे याला डायरेक्ट दर्शन दिलं जातं, असं भाविक म्हणणार म्हणूनच मी आज बाहेरून दर्शन घेतलं आहे. पण आळंदीत घडणारे प्रकार ही चिंताजनक बाब आहे," असं अजित पवार म्हणाले.

...तर टायरमध्ये घ्या

"आता मी पोलिसांना हवं ते देतोय. मात्र त्यांचं काम नाही का? 2 नंबरचे धंदे बंद करण्याची जबाबदारी कोणाची आहे? इथं असणाऱ्या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी आणि योग्य तो बंदोबस्त लावावा. कायदा सर्वांना समान आहे. आम्ही कोणताही राजकीय हस्तक्षेप केला नाही अन् करणार ही नाही. पोलिसांनी पोलिसांचं काम करावं. चुकीचं वागला तर टायरमध्ये घ्या," असा इशाराच अजित पवारांनी पोलिसांना दिला.

उमेदवारी जवळपास जाहीर

एखाद्या मतदारसंघांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणणे हे काही साधं सोपं काम नाही. हे येड्या गाबाळ्याचे काम नाही. त्यासाठी एक धमक लागते. अशी धमक दिलीप मोहिते पाटील यांच्यामध्ये आहे. आता ज्या ठिकाणी प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन करणार आहे त्यासाठी मोहितेंनी चार वर्ष पाठपुरावा केला. एखादा दुसरा आसता तर जाऊ दिलं असतं. मात्र हे काम आणि झालेच पाहिजे ते ही इथेच, अशी धमक आहे त्यांच्यात," असं म्हणत अजित पवारांनी आमदार दिलीप मोहितेंचं कौतुक केलं. "सरपंच ते आमदार पर्यंत दिलीप मोहिते यांचा प्रवास मला माहिती आहे," असंही अजित पवार म्हणाले. "सगळ्यांची इच्छा आहे त्यांनी आता आमदारकीच्या पुढे जावं. तुम्ही उद्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिक्यांनी त्यांना निवडून द्या. उद्याला महायुतीचे उमेदवार म्हणून तिकीट वाटप ज्यावेळेस होईल आणि ही जागा राष्ट्रवादीला जर आली तर दिलीप मोहिते पाटलांना निवडून द्या," असं अजित पवार म्हणाले. 

"उगाच कुणी म्हणायला नको की उमेदवारी जाहीर करायला लागलाय. काय चाललंय? अजून कुठली जागा जाहीर झाली नाही पण राष्ट्रवादीला महायुतीच्या वतीने जागा मिळाली तर सगळ्यांचा कल कार्यसम्राट आमदार दिलीप मोहिते पाटलांनी अजून एक संधी द्यावी आणि तुमच्या मनातलं अपूर्ण राहिलेलं जी गाडी सरपंचापासून आमदारापर्यंत थांबली की पुढं पण जरा दिव्यापर्यंत पोचली पाहिजे," असं अजित पवार म्हणाले. महायुतीकडून खेडची जागा मिळाली तर दिलीप मोहिते पाटील यांना उमेदवार म्हणून एकवेळ संधी देऊन मंत्रीपद सुद्धा देणार, असल्याचा शब्द अजित पवारांनी दिला.