MP Viral Video: महाराष्ट्रातील अनेक भागांना जोरदार पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या हाती आलेलं पिक पाण्यात गेलं आहे. या अवकाळी संकटामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलेलं असतानाच नेते मंडळी अगदी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचं सांत्वन करताना दिसत आहेत. मात्र काँग्रेसच्या एका खासदाराने पूरपरिस्थितीच्या पहाणीदरम्यान चक्क रिल शूट केल्याचा प्रकार समोर आला आहे. पूरग्रस्त भागातील हा रिल शुटींगचा प्रताप कॅमेरात कैद झाला असून या खासदाराविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.
गेल्या दोन दिवसात गोंदिया, भंडारा जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी शेतामध्ये गुडघाभर पाणी भरलं आहे. काही ठिकाणी शेतामधून पाणी अगदी डांबरी रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये झालेल्या नुकसानीची पहाणी करायला गेलेल्या एका खासदाराने चक्क स्वत:च्या कारच्या बोनेटवर आडवं पडून रिल शूट केला आहे.
ज्या खासदाराला अगदी पूरग्रस्त भागात रिल शूट करण्याचा मोह आवरला नाही त्या खासदाराचं नाव आहे, प्रशांत पाटोळे! पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यात तेथील स्थानिकांचं सांत्वन करण्याचं, त्यांना धीर देण्याचं सोडून खासदार रील बनवताना दिसले. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे, उभ्या पिकात अजूनही गुडघाभर पाणी दिसत आहे, गावकऱ्यांची घरं पडली आहेत अशा ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून पाटोळेंनी संवेदनशीलता दाखवणं अपेक्षित होतं. मात्र त्यांना ते जमलं नाही. शेतामधून डांबरी रस्त्यावर आलेल्या पाण्यातून गाडी काढतानाचा रील बनवतानाचा प्रशांत पटोळेंचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पटोळे हे आपल्या कारच्या बोनेटवर पहुडले असून हातवारे करुन पोज देताना दिसत आहेत.
खासदाराने लोकांना धीर देण्याऐवजी जिल्ह्यातील खासदार पूरग्रस्तभागातील पीडितांसमोर आपल्या भरधाव कारणे साचलेल्या पाण्यातून फवारा उडवत रिल कसा काय बनवू शकतो? लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या संवेदना संपल्यात का? पूरग्रस्त भागातील लोकांच्या वेदना ऐकून घेण्याऐवजी पावसाच्या पाण्यात हा त्यांचा पोरखळ लोकांच्या दुखण्यावर फुंकर मारण्याऐवजी त्यावरील खपल्या काढणार आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...
काँग्रेस खासदाराच्या या व्हायरल व्हिडीओसंदर्भात विचारलं असता विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आपण हा व्हिडीओ पाहिला नसल्याचं सांगत यावर प्रतिक्रिया नोंदवण्यास नकार दिला.