Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री होणार या चर्चा अधूनमधून उठत असतात. काही महिन्यात या चर्चांना पूर्णविराम लागला होता. मात्र आता भावी मुख्यमंत्री अजितदादा अशा टोप्या घालून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला आघाडीनं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या मेळाव्यात महिला कार्यकर्त्यांनी अजितदादांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला. भावी मुख्यमंत्री अजितदादा अशा टोप्या घातल्या, बॅनरबाजीही केली. भावी मुख्यमंत्री अजितदादा या बॅनरबाजीची शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी खिल्ली उडवली.
एकीकडे शिंदे गटाविरोधात अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे, तर दुसरीकडे त्याचवेळी अजित पवार गटाकडून भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय. मुख्यमंत्री होण्यासाठीच अजित पवार महायुतीसोबत आलेत अशी एक थिअरी पूर्वी सांगितली जात होती. दादांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चाही अधूनमधून सुरु असतात. आता खुद्द राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भावी मुख्यमंत्री उल्लेख करत अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा निर्धार करण्यात आलाय. त्यामुळे हे ठरवून करण्यात आलं का याची चर्चा सुरु झालीय.
अजित पवार आपल्या काकांचं काय वय विचारता त्यांनी मोदी साहेबांचं वय विचारलं पाहिजे. असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवारांना आव्हान केले. त्याला अजित पवारांनी उत्तर दिले. ज्यावेळेस ते 80 वर्षांचे होतील त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारू असं अजित पवार म्हणालेत.
काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंनंतर विविध पक्षांमधल्या राजकीय नेत्यांनी भाजपची ऑफर आल्याचा दावा केलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टींनी भाजपनं मध्यस्थांमार्फत संपर्क साधल्याचा दावा केलाय. तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनीही भाजपनं ऑफर दिल्याचं सूचक विधान केलंय. मात्र दोघांनीही भाजपसोबत हातमिळवणी करणार नसल्याचा खुलासा केलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकाच दिवशी सोलापुरात असणारेत. उद्या सोलापुरात 15 हजार घरकुलांच्या चाव्या पंतप्रधानांच्या हस्ते देण्यात येतील. तसंच रोड शो देखील होण्याची शक्यताय. तर दुसरीकडे शरद पवारही उद्या सांगोला आणि मंगळवेढ्यात कार्यक्रमानिमित्त येणारेय.