अजित पवारांचा काकांना धक्का? 8 खासदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न, एका महिला नेत्यावर जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता नवा डाव आखला जात आहे. शरद पवारांच्या पक्षाच्या 8 खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून संपर्क साधला जात असल्याची माहिती आहे. एका महिला नेत्यावर राष्ट्रवादीनं ही जबाबदारी टाकल्याची सूत्रांची माहिती.

सोनेश्वर पाटील | Updated: Dec 4, 2024, 08:58 PM IST
अजित पवारांचा काकांना धक्का? 8 खासदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न, एका महिला नेत्यावर जबाबदारी title=

उर्वशी खोना (प्रतिनिधी) : अजित पवार विरुद्ध शरद पवार लढाईच्या नव्या अंकाला सुरुवात झाली आहे. पक्षाचं नाव आणि चिन्हं अजित पवारांना देण्यात आलं. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दारूण पराभव झाला. मात्र शरद पवारांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राष्ट्रवादीने लोकसभेत घवघवीत यश मिळवलं. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी पराभवाचा वचपा काढत दणदणीत यश मिळवलं. 

आता दिल्लीच्या राजकारणात अजित पवार शरद पवारांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8 खासदारांना अजित पवारांच्या पक्षाकडून संपर्क करण्यात आल्याची माहिती आहे. शरद पवारांना धक्का देण्याच्या या मिशनची जबाबदारी एका महिला नेत्याच्या खांद्यावर टाकण्यात आलीय. अजित पवारांनी दिल्ली दौरा त्याच चाचपणीसाठी केल्याची माहिती समोर येतेय.

अजित पवारांचा काकांना धक्का? 

राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार पक्षाच्या खासदारांना संपर्क साधण्यात येत आहे. या कामगिरीची जबाबदारी राष्ट्रवादीतल्या महिला नेत्यावर सोपवण्यात आली आहे. महिला नेत्याकडून खासदारांना संपर्क केला जात असल्याची सुत्रांची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीतल्या यशानंतर आता राष्ट्रवादीनं शरद पवारांना आणखी एक धक्का देण्याची तयारी केली आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे पवारांच्या खासदारांना गळाला लावण्यात दादांना यश येणार का, हे पाहावं लागणार आहे.

विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना मोठं यश

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बहुतांश आमदार आणि पदाधिकारी हे अजित पवार यांच्यासोबत गेले. त्यानंतर राष्ट्रवादी कुणाची या न्यायालयीन लढाईत राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना मिळाले. विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर मात करून अजित पवार यांनी मोठं यश मिळवलं. आता शरद पवार यांच्या खासदारांवर अजित पवार यांच्या पक्षाचा डोळा असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या राजकारणात राष्ट्रवादीला यश मिळेल का, हे पाहावे लागणार आहे.