Ajit Pawar: विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते त्यांच्या नव्या व्हिडिओमुळे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचा डोळा मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यांनतर आता त्यांच्या बुक्की मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांना अजित पवार हळूच बुक्की मारत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. शंभूराज देसाई यांना गुपपूच मारलेल्या बुक्कीचा अर्थ काय याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (maharashtra budget session 2023) सुरु आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई धुळ्याचे एमआयएमचे आमदार फारूख शेख यांना पाय-यांवर सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यासाठी गेले होते. त्यावेळी अजितदादांनी देसाईंसोबत केलेल्या मस्करीचं दृश्यं कॅमे-यात कैद झाले आहे. शंभूराज देसाई यांनी आपला हात दादांच्या हातामागे नेला आणि लगेचच अजितदादांनी त्यांच्या मांडीवर जोरात बुक्की लगावली. त्यानंतर दोघेही मिश्कीलपणे हसले. मात्र दोघांमध्ये नेमकं काय झालं यावरून आता जोरदार चर्चा रगंली आहे.
यापूर्वी अधिवेशना दरम्यानच अजित पवार यांचा असा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. 9 मार्च रोजी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister and State Finance Minister Devendra Fadnavis) राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रसारमाध्यमांना बजेटवर प्रतिक्रिया देत असताना अजित पवार यांची वेगळीच बॉडी लँग्वेज पहायला मिळाली. उद्धव ठाकरे बोलत असताना अजित पवार यांचे याकडे अजिबात लक्ष नव्हते. अजित पवार इकडे तिकडे पाहत असल्याचे व्हिडित दिसत आहे. त्यांच्या बाजूला उभे असलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या खांद्यावर ते हात ठेवतात आणि डावीकडे पाहत हळूच कुणाला तरी डोळा मारतात असे व्हिडिओत दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता.
डोळा मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यांनतर अजित पवार यांनी नेमकं कुणाला आणि का डोळा मारला याची जोरदार चर्चा रंगली. अखेर अजित पवार यांनी याचा खुलासा केला. उद्धव ठाकरे बोलत असताना एक पत्रकार मला प्रश्न विचारत होता. उद्धव ठाकरे यांचे बोलून झाल्यावर मी प्रश्नाचे उत्तर देतो हे त्याला सांगण्याचा इशारा म्हणून मी त्या पत्रकाराला डोळा मारल्याचे अजित पवार म्हणाले.