नयनतारा सहगल यांच्याऐवजी आयोजकांकडून 'या' तीन नव्या नावांचा प्रस्ताव

साहित्य महामंडळाच्या परवानगीनंतर यापैकी एक नाव निश्चित करण्यात येईल.

Updated: Jan 8, 2019, 04:53 PM IST
नयनतारा सहगल यांच्याऐवजी आयोजकांकडून 'या' तीन नव्या नावांचा प्रस्ताव title=

यवतमाळ: ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून आता नव्या नावांची चर्चा सुरु झाली आहे. डॉ. वि. भि. कोलते संशोधन केंद्र आणि वाचनालय या संस्थेकडे साहित्य संमेलनाचे यजमानपद आहे. सुरुवातीला संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, काही स्थानिक नेत्यांच्या दबावामुळे आयोजकांनी नयनतारा सहगल यांना न बोलवण्याचा निर्णय घेतला होता. यावरून मराठी साहित्यविश्वात आणि रसिकवर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता आयोजकांनी स्वत:ची उरलीसुरली पत वाचवण्यासाठी तीन नव्या नावांचा प्रस्ताव साहित्य महामंडळाकडे पाठवला आहे. त्यानुसार संमेलनाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, सुरेश द्वादशीवार आणि विठ्ठल वाघ यांना उद्घाटक म्हणून आमंत्रित करण्याचा आयोजकांचा मानस आहे. साहित्य महामंडळाच्या परवानगीनंतर यापैकी एक नाव निश्चित करण्यात येईल. मात्र, या सगळ्या वादामुळे महेश एलकुंचवार, सुरेश द्वादशीवार आणि विठ्ठल वाघ संमेलनाला उद्घाटक म्हणून हजेरी लावणार का, याविषयी अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. 

दरम्यान, नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यावरून आयोजक आणि साहित्य महामंडळावर टीका होत आहे. संमेलनावर बहिष्कार टाकणाऱ्या निमंत्रितांची संख्या वेगाने वाढत असल्याने संमेलनच धोक्यात आले आहे. ११ जानेवारीपासून यवतमाळ येथे तीन दिवसीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. आतापर्यंत ३० पेक्षा अधिक साहित्यिकांनी या संमेलनावर बहिष्कार घातला आहे. तर दुसरीकडे शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीनेही हे अधिवेशन रद्द करण्याची मागणी केली आहे. संमेलनाच्या निमित्ताने गोळा झालेला निधी जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आयोजकांनी स्वत: त्यांच्या घरी जाऊन द्यावा, त्यासाठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी पुढाकार घ्यावा, असे शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीने सांगितले.