...या यात्रेत जुळल्या जातात आयुष्याच्या गाठी!

यात्रेत लग्न होतंय का...? या प्रश्नाचं उत्तर होय असं आहे... अन ही यात्रा आहे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वस्तापूर गावातली...

Updated: Oct 26, 2017, 10:49 PM IST
...या यात्रेत जुळल्या जातात आयुष्याच्या गाठी! title=

जयेश जगड, झी मीडिया, अकोला : यात्रेत लग्न होतंय का...? या प्रश्नाचं उत्तर होय असं आहे... अन ही यात्रा आहे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वस्तापूर गावातली...

या गावातील आदिवासींची ही जत्रा लग्न करून देणारी जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे. गेल्या १४७ वर्षांची परंपरा असलेली ही जत्रा सातपुड्यातील हजारो आदिवासींच्या लग्नगाठी बांधायला कारणीभूत ठरलीय.

अकोल्याच्या वस्तापूर गावातल्या यात्रेतली गर्दीची दृष्य दरवर्षी दिसतात... त्यातही आदिवासी तरुण-तरुणींची संख्या अधिक असते... त्याला कारणही तसंच आहे... या यात्रेत अनेक जण आपला जीवनसाथी निवडतात... दिवाळीनंतर येणाऱ्या पांडव पंचमीला दोन दिवसांची यात्रा असते...

परंपरा... जीवनसाथी निवडण्याची!

जत्रेत आलेले भालचंद्र अन् भगीरथी थोटे दाम्पत्य... १५ वर्षांपूर्वी त्यांनी इथंच एकमेकांना पाहिलं... पळून गेले अन् लग्न केलं... त्याच आठवणी जागवण्यासाठी आपण पुन्हा या यात्रेत आल्याचं ते सांगतात.

१८७० मध्ये वस्तापूर गावातल्या घिसू म्हातिंग पाटील यांनी ही यात्रेची परंपरा सुरू केली... आदिवासी एकत्र यावेत, त्यांच्यात विचार आणि नातेसंबंधांचं आदानप्रदान व्हावं हा त्यामागचा हेतू...

मुलींना निवडीचं स्वातंत्र्य

यात्रेत एकमेकांना पसंत करुन लग्नगाठी बांधण्याची परंपरा आहे... ज्या काळात महिलांना बोलण्याचीही संधी नव्हती त्यावेळी त्यांना जीवनसाथी निवडण्याचं स्वातंत्र्य या माध्यमातून दिलं गेलं. पळून गेलेल्या जोडप्याला २-३ दिवसांत पंच कमिटीसमोर हजार व्हावं लागतं. ही कमिटी मुलाला त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार दंड ठोठावते... तो दंड मुलीच्या पालकांना दिला जातो.

यात्रेतल्या रेड्यांच्या शर्यती मात्र सध्या बंदीमुळं बंद आहे. यात्रेसाठी गाव नवरीसारखं सजतं... ही यात्रा म्हणजे सातपुड्यातल्या आदिवासींसह पंचक्रोशीतल्या गावांसाठी जणू आनंदमेळाच... आदिवासी संस्कृतीला वैभवशाली बनविणारी ही परंपरा एकदा तरी पाहण्यासारखी आहे...