काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेंटल हॉस्पिटलमध्ये नोंदवलं अमोल मिटकरींचं नाव; कारणही सांगितलं

NCP Crisis : अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षामध्ये दोन गट पडले आहेत. विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांना साथ दिली आहे. त्यामुळे इतके दिवस भाजपवर निशाणा साधणाऱ्या मिटकरींनी थेट भाजपसोबत सत्तेत सहभागी होत अनेकांना धक्का दिला आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 7, 2023, 01:28 PM IST
काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेंटल हॉस्पिटलमध्ये नोंदवलं अमोल मिटकरींचं नाव; कारणही सांगितलं title=

जयेश जागड, झी मीडिया, अकोला : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये (Shinde Fadnavis Government) सामील होत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) 27 आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. 2 जुलै रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर इतर नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या राजकीय भूकंपानंतर महाराष्ट्रातल्या जनतेसह कार्यकर्त्यांनाही मोठा धक्का बसला आहे. अशातच आता अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांना लोकांकडून लक्ष्य केले जात आहे.

अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून महाविकास आघाडीकडून टीकेची झोड उठत आहे. अकोल्यातही अजित पवार यांचे समर्थक आमदार अमोल मिटकरी यांना देखील याचा सामना करावा लागत आहे. राजभवनातील शपथविधी सोहळ्याला अमोल मिटकरी यांनी हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. भाजपवर कायमच निशाणा साधणारे मिटकरी त्यांच्याच सोबत सत्तेत गेल्याने त्यांच्यावर टीका केली जात होती. अशातच एका कॉंग्रेस कार्यकर्त्यांने त्यांच्या नावाची थेट एका मनोरुग्णालयात नोंदणी केली आहे.

अकोल्यातील काँग्रेस कार्यकर्ते अंकुश गावंडे यांनी अमोल मिटकरी यांची मनोरुग्णालयात तपासणी करता नोंद केली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी अमोल मिटकरिंच्या नावाची नोंद अकोल्यातील मनोरुग्ण तज्ञ डॉ.तिरुख यांच्याकडे केळी आहेय. मिटकरी भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्याने त्यांच्या नावाची नोंद रुग्णालयात केली आहे. मिटकरी यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचा टोलाही या काँग्रेस कार्यकर्त्याने लगावला आहे. मात्र हे कार्यकर्त्याचे वैयक्तिक मत असून याच्याशी पक्षाचा नसल्याचं काँग्रेसने स्पष्ट केलं आहे.

"अमोल मिटकरी यांची प्रकृती मला कुठेतरी ढासळल्यासारखी दिसली. कालपर्यंत आमच्या लोकांना शाहू, फुले, आंबेडकर यांच्याविषयी सांगणारे मिटकरी अचानक राजभवनात भाजपसोबत बसलेले दिसले. याबाबत त्यांना विचारले असता त्यांचे वर्तन लाजिरवाणे असे होते. त्यांचे हसणे, मान खाली टाकून बसणे हे पाहून आम्ही अकोलेकर अस्वस्थ झालो. याबाबत विचारणा करण्यासाठी आम्ही त्यांना फोन केला. पण त्यांचे उत्तर ऐकून मला खात्री पटली की त्यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यांनी आता सांगितले आहे की मला विकासाच्या मुद्द्यावर काम करायचे आहे. त्यामुळे शहराचा विकास योग्य रितीने झाला पाहिजे आणि यासाठी त्यांची प्रकृती चांगली असायला हवी. म्हणून आम्ही अकोल्यातील प्रसिद्ध मानसोपचारतज्ञांची भेट घेऊन त्यांच्याकडे नंबर लावला आहे. त्यामुळे अमोल मिटकरी जेव्हा अकोल्याला येतील तेव्हा त्यांनी रुग्णालयात जावं," अशी विनंती काँग्रेस कार्यकर्ते अंकुश गावंडे यांनी केली आहे