धक्कादायक! गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या संपर्कात असणाऱ्या तरुणाला अकोल्यात अटक

Gangster Lawrence Bishnoi : गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात झाली आहे. आता लॉरेन्स बिश्नोईच्या संपर्कात असणाऱ्या तरुणाला अकोला पोलिसांनी अटक केली आहे. हा तरुण लॉरेन्सच्या संपर्कात होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आकाश नेटके | Updated: Feb 4, 2024, 04:16 PM IST
धक्कादायक! गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या संपर्कात असणाऱ्या तरुणाला अकोल्यात अटक title=

जयेश जागड, झी मीडिया, अकोला : गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचा कट रचणाऱ्या गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या मुसक्या आवळ्यास सुरुवात करण्यात आली आहे. आता गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या संपर्कात असलेल्या एका तरुणाला महाराष्ट्रातून अटक करण्यात आली आहे. गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असणाऱ्या तरुणाला अकोला पोलिसांनी अटक केली आहे. शुभम लोणकर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शुभम लोणकर आणि त्याच्या दोन साथीदारांना अवैधरित्या देशी बंदूक बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन देशी पिस्टलसह नऊ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. चौकशीदरम्यान, पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत.

आरोपी लोणकर हा व्हिडीओ कॉल आणि ऑडिओ कॉलद्वारे अनमोल बिश्नोईच्या संपर्कात असल्याचं ही निष्पन्न झालं आहे. तर आरोपी लोणकर दुबईच्या गँगस्टरच्या संपर्कात असल्याचं त्याला आलेल्या इंटरनॅशनल कॉलच्या माध्यमातून प्रथमदर्शनी तपासात दिसत असल्याचं पोलिसांनी म्हटलं.

"अकोट येथून दोन पिस्तुल आणि नऊ काडतुसे जप्त करण्यात आली होती. यात दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. तपासात असे दिसून आले पुण्यातील एक आरोपीमार्फत शस्त्रांची डिलिव्हरी देण्यात आली होती. तांत्रिक तपासात दिसून आले की, आरोपीने लॉरेन्स बिश्नोईला दोनदा व्हिडीओ कॉल आणि त्याच्या भावाला ऑडिओ कॉल केल्याचे समोर आलं आहे," अशी माहिती अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी दिली.

पंजाबमध्येही मोठी कारवाई

पंजाब पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी मनदीप सिंग उर्फ ​​छोटा मणी याला अटक केली आहे. गायक सिद्धू मूसेवालाच्या मारेकऱ्यांना लपण्याची व्यवस्था मनदीप सिंगने केली होती. पोलिसांनी मनदीप सिंग याच्यासह त्याचा साथीदार जतिंदर सिंग याला गोविंदपुरा परिसरातून अटक केली. दोघांकडून 13 काडतुसांसह दोन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. छोटा मणी जिरकपूर परिसरात असल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर पंजाब पोलिसांच्या अँटी गँगस्टर टास्क फोर्सच्या पथकांनी माहितीच्या आधारे कारवाई करत मणी आणि त्याच्या साथीदाराला अटक केली. दोन्ही आरोपी लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार टोळीसाठी काम करत होते.