राम मंदिराच्या भूमिपूजनाचं सर्व मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ५ ऑगस्ट रोजी होणार आहे. 

Updated: Jul 22, 2020, 08:24 PM IST
राम मंदिराच्या भूमिपूजनाचं सर्व मुख्यमंत्र्यांना निमंत्रण title=

पुणे : अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ५ ऑगस्ट रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी देशाच्या सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याचं राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे खजिनदार स्वामी गोविंद देव गिरी म्हणाले. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिराबाबत मोठी भूमिका घेतल्याचंही गोविंद देव गिरी म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अयोध्येत जाण्यासाठी कोणत्याही निमंत्रणाची गरज नसल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत कालच म्हणाले होते. 

'राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण दिलं, त्यांनी मोठ्या भक्तीभावाने हे निमंत्रण स्वीकारलं. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन होईल. कोरोनाच्या संकटात सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त २०० जण, ज्यापैकी १५० पाहुण्यांना बोलवण्याचा निर्णय घेतला आहे,' असं वक्तव्य स्वामी गोविंद देव गिरी यांनी केलं. 

राम मंदिराचं भूमिपूजन करण्याआधी पंतप्रधान मंदिरामध्ये रामाचं दर्शन घेतील, तसंच ते हनुमान गढी येथे जाऊन हनुमानाचीही प्रार्थना करतील, असं स्वामी गोविंद देव गिरी यांनी सांगितलं.