कोल्हापूर : श्री महालक्ष्मी देवीच्या नावावरुन सुरू असलेल्या वादात आता अजून एका प्रकरणामुळे भर पडली आहे. त्यामुळे अंबाबाई भक्तांमध्ये निराशेचे वातावरण असून देवस्थान समितीला प्रश्न विचारले जात आहेत.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं श्री महालक्ष्मी देवीच्या नावावरुन सुरु असलेल्या वादात भर टाकली आहे. महालक्ष्मी आणि अंबाबाई नावावरुन सुरु असलेल्या वादात पडायला नको म्हणून देवस्थान व्यवस्थापन समितीनं मंदिर परिसरात लावलेल्या बोर्डमध्ये करवीर निवासीनी देवस्थान कार्यालय असा उल्लेख केला आहे.
१९४९ च्या गॅजेटनुसार हा उल्लेख बरोबर असला तरी देवस्थान समिती दुसऱ्या बाजूस याच कार्यालयातून गोळा करणाऱ्या देणग्याच्या पावती बुकात मात्र करवीर निवासिनी महालक्ष्मी असा उल्लेख केलेला आहे. त्यामूळे देवस्थानाची ही दुटप्पी भूमिका आहे का असा प्रश्न विचारला जात आहे.
पावती बुकात करवीर निवासिनी असा उल्लेख असतानामंदिर परिसरात लावलेल्या बोर्डमध्ये देवीचं नाव का वगळण्यात आलं असा सवाल अंबाबाई भक्तांतर्फे केला जात आहे. या वादानंतर आज सकाळी झी २४ तासची टीम महालक्ष्मी मंदिरात पोहचली. त्यावेळी देवस्थान व्यवस्थापन समितीनं यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायला नकार देवून, थेट मंदिर परिसरात लावलेले बोर्ड उतरवून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.