मजुरीत 200 रुपये दिले कमी, रागाच्या भरात मजुराने मुकादमासोबत जे केलं ते हादरवणारं!

Ambernath Crime:  ठेकेदाराने मालकाकडून किती रुपये घेतले? मजुरांना किती रुपये दिले? ठेकेदाराची हत्या करण्यामागचं कारण काय?  याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Pravin Dabholkar | Updated: Sep 16, 2024, 11:46 AM IST
मजुरीत 200 रुपये दिले कमी, रागाच्या भरात मजुराने मुकादमासोबत जे केलं ते हादरवणारं! title=
मजुराने मुकादमाची केली हत्या

Ambernath Crime: ठेकेदार मालकाकडून कामाचा ठेका घेतात. मजुरांना कामावर ठेवतात आणि त्यांना मजुरी देतात. पण कामापेक्षा कमी मुजरी देणं एका ठेकेदाराच्या जीवावर बेतलं आहे. मजुरीचे पैसे कमी देत असल्याने मजूर आणि ठेकेदार यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की त्यात ठेकेदाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी मजुराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ठेकेदाराने मालकाकडून किती रुपये घेतले? मजुरांना किती रुपये दिले? ठेकेदाराची हत्या करण्यामागचं कारण काय?  याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

काय आहे प्रकरण?

मजुराने मुकादमाच्या डोक्यात हातोडा घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अंबरनाथच्या वडवली सेक्शन परिसरातील निर्माणाधिन इमारती मध्ये घडला आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली. पूर्वेच्या वडवली सेक्शन परिसरातील दत्त साई कॉ. ऑप. हाऊसिंग सोसायटीच्या इमारतिचं पुनर्विकासाठी निष्कासन कार्य सुरू आहे. निर्माणाधिन इमारतीचे अंतर्गत पाडकाम सुरु असून याठिकाणी पश्चिम बंगाल राज्यातून आलेले तीन मजूर काम करून तिथेच राहत होते. 

डोक्यात हातोडा घालून हत्या

मुकादम असलेला अब्दुल रेहमान याची त्याच्यासोबत राहत असलेला मजूर सलीम शेख  याने डोक्यात हातोडा घालून हत्या केली, मृत अब्दुल रेहमान, सलीम शेख आणि मोहम्मद अली हे तिघे पश्चिम बंगाल राज्यातील रहिवासी असून ते दत्त साई कॉ. ऑप. सोसायटीच्या इमारतीमध्ये काम करीत होते. 

मालकाकडून 900 रुपये घेऊन मजुरांना 700 मजुरी 

मात्र मुकादम मालकाकडून 900 रुपये घेऊन मजुरांना 700 मजुरी देत असल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. हाच राग मनात धरून रविवारी पहाटे चार वाजताच्या दरम्यान आरोपीने मुकादमाच्या डोक्यात हातोडा मारून त्याला गंभीर जखमी केले. मृत अब्दुल रेहमान याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

मुकादमाचा उपचारादरम्यान मृत्यू

मात्र उपचारादरम्यान मुकादमाचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मोहम्मद अली याने दिलेल्या फिर्यादीनुसार, हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी सलीम शेख याला अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी यासंदर्भात माहिती दिली.