लातूर : आज महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आलं आहे. या आंदोलनाला लातूर जिल्ह्यात मध्यरात्रीपासूनच सुरुवात झाली. मराठा आंदोलकांनी लातूर-बार्शी महामार्गावरील साखरा पाटी इथे टायर जाळून रास्तारोको करण्यात आला. तर काल संध्याकाळी लातूर-बार्शी मार्गावर मुरुड येथे ही रास्तारोको करण्यात आला होता. साखरा पाटी येथे टायर पेटवून प्रचंड घोषणाबाजी करत आंदोलक मराठा आरक्षणाची मागणी करीत होते. दरम्यान जिल्ह्यात आजही हिंसक आंदोलने होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी ही मोठा बंदोबस्त जिल्ह्यात ठेवला आहे.
मराठा आंदोलनात माजी राज्यमंत्री आणि लातूरचे काँग्रेस आमदार अमित विलासराव देशमुख यांचाही सहभाग आहे. मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ यावळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लातूर-तुळजापूर महामार्गावर वासनगाव पाटी येथे ठिय्या आंदोलन करण्यात आलं.