"...म्हणून मी खासदारकीचा राजीनामा शरद पवारसाहेबांकडे सोपवणार"; अमोल कोल्हेंची मोठी घोषणा

Amol Kolhe To Resign: अमोल कोल्हे हे स्वत: रविवारी राजभवनामध्ये पार पडलेल्या अजित पवारांच्या शपथविधीच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपण शरद पवारांबरोबर असल्याचं स्पष्ट केलं होतं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 4, 2023, 09:21 AM IST
"...म्हणून मी खासदारकीचा राजीनामा शरद पवारसाहेबांकडे सोपवणार"; अमोल कोल्हेंची मोठी घोषणा title=
अमोल कोल्हेंनी सत्तासंघर्षादमरम्यान घेतला महत्त्वाचा निर्णय

Amol Kolhe To Resign: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या (Ajit Pawar) नेतृत्वाखाली झालेल्या बंडखोरीनंतर चर्चेत असलेलं एक प्रमुख नाव म्हणजे पक्षाचे खासदार अमोल कोल्हे! अमोल कोल्हे हे राजभवनामधील शपथविधीसाठी अजित पवारांबरोबर उपस्थित होते. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी 'मी साहेबांबरोबर आहे,' असं म्हणत आपण शरद पवारांबरोबर असल्याचं जाहीर केलं आहे. अमोल कोल्हेंनी या बंडखोरीनंतर आपली भूमिका मांडताना थेट राजीनामा देण्याची भाषा केली आहे. आपण शरद पवारांकडे राजीनामा सादर करणार असल्याचं अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे.

माझा आतला आवाज सांगतोय

राज्यामध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपण राजीनामा देणार असल्याचं अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदारांनी जे मतदान केलं ते एका विचारधारेवर विश्वासावर ठेऊन केले असल्याने मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून मी माझा खासदार पदाचा राजीनामा शरद पवार साहेबांकडे देणार असून माझा आतला आवाज सांगतोय की मी शरद पवारसाहेबांसोबतच रहावं, अमोल कोल्हेंनी एका वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे. आज अमोल कोल्हे शरद पवार यांची भेट घेणार आहेत. 'सिल्व्हर ओक' या शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

...म्हणून शपथविधीला उपस्थित होतो

अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित असण्यासंदर्भात अमोल कोल्हेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी माझ्या कामानिमित्त अजित पवारांना भेटायला गेलो होतो. शपथविधी असल्याने तिकडे गेलो नव्हतो. मला या शपथविधीची काहीही कल्पना नव्हती. तिथे गेल्यानंतर मला यासंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतरच मी माझ्या कार्यालयाला राजीनामा तयार ठेवण्यासंदर्भातील निर्देश दिले, असं अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे.

मी 4 वर्षांपासून करतोय प्रतिनिधित्व, आता...

मतदारांचा विश्वास तोडण्यासाठी मी राजकारणामध्ये आलेलो नाही. गेल्या 4 वर्षांपासून मी शिरुर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असून केंद्रात या मतदारसंघातील अनेक प्रश्न मी उपस्थित केले आहेत. केंद्राच्या अनेक धोरणांसंदर्भात मी विरोधी भूमिका घेतली आहे. मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये मी माझी भूमिका कशी बदलू शकतो असा प्रश्न मला सतावतोय, असंही कोल्हे यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांना विचारण्यात आला प्रश्न

अमोल कोल्हे अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थिती होते यासंदर्भात मंगळवारी शरद पवारांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना शरद पवारांनी ते त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर होते. त्याच काही गैर नाही. ते अनोळखी होते असं नाही, असंही शरद पवारांनी म्हटलं.