देवा तुला शोधू कुठे? पुण्याच्या संगमनेरमध्ये मंदिरातून दत्ताची मूर्ती चोरीला

पुण्यातील दत्त मंदिरातून दत्ताची मूर्ती चोरीला गेली आहे. रात्रीच्या वेळेस चोरट्यांनी ही मूर्ती चोरली आहे. 

Updated: Dec 5, 2023, 05:21 PM IST
देवा तुला शोधू कुठे? पुण्याच्या संगमनेरमध्ये मंदिरातून दत्ताची मूर्ती चोरीला  title=

Pune Crime News :  पुणे शहर तसेच ग्राणीम भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. खून, दरोडे या सारख्या घटना सातत्याने घडत आहेत. अशातच आता मंदिरातील देव देखील सुरक्षित नाहीत. मंदिरातील देवाची मूर्ती देखील चोरीला जात आहे. पुण्याच्या संगमनेरमध्ये मंदिरातून दत्ताची पंचधातूची मूर्ती चोरीला गेली आहे. सकाळी ग्रामस्थ दर्शनसाठी आले असता. मूर्ती गायब होती. ही घटना वाऱ्यासारखी गावभर पसरली. देवा तुला शोधू कुठ? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला. ग्रामस्थांनी तात्काळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

पुण्याच्या भोर तालुक्यातील संगमनेर गावात, दत्त मंदिरातील पंचधातूच्या दत्त मूर्तीची चोरी झाल्याची घटना घडलीय. मूर्ती चोरी झाल्याची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली.  पोलिसांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेत पाहणी करत पंचनामा केला.  भोरच्या राजगड पोलिस ठाण्यात या मूर्ती चोरीची तक्रार दाखल झाली आहे. पोलिस मूर्ती चोरणाऱ्या चोराचा शोध घेत आहेत.

सिद्धीविनायक मंदिरातून चोरी झालेली मूर्ती दोन तासात परत मिळाली

पुण्यातल्या लष्कर भागातल्या प्रसिद्ध श्री सिद्धीविनायक मंदिरातील चोरीला गेलेली पंच धातूची मूर्ती लष्कर पोलिसांमुळे दोन तासात परत मिळाली होती. लष्कर भागात सोनारांची बाजारपेठ आहे. इथे सिद्धीविनायक मंदिरातून मंगळवारी दुपारी 12 ते दोनच्या सुमारास पाच किलो वजनाची पंचधातूची भरीव मूर्ती चोरीला गेली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं. हे फुटेज सर्वठिकाणच्या पोलिसांना पाठवण्यात आलं. त्यानंतर पुणे स्थानकात एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना आढळली. त्याला ताब्यात घेतलं असता त्याच्याकडे गणपतीची मूर्ती सापडली. ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव अमर अवघडे असं आहे. 

राम मंदिरातील  दीड हजार वर्षापूर्वीच्या16 पंचधातूच्या मूर्ती चोरी

लातूर जिल्ह्यातील रेणापूर इथल्या राम मंदिरातील 16 पंचधातूच्या मूर्ती चोरीला गेल्या होत्या. या सर्व मूर्ती दीड हजार वर्षापूर्वीच्या असल्याचे सांगण्यात येत असून यांत राम, कृष्ण, बालाजी, पद्मावती देवी आणि इतर देवीदेवतांच्या बारा मूर्ती चोरट्यांनी चोरल्यात. मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी या अतिप्राचीन मूर्ती चोरल्यात. जागतिक बाजारात या मूर्तींची किंमत कोट्यवधी असल्याचे सांगण्यात येतंय. या चोरीमागे मोठं रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय. पुजारी आणि काही भाविक दर्शनासाठी आल्यानंतर चोरीचा हा प्रकार उजेडात आला होता.