सांगली : अनिकेत कोथळे हत्याप्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली आहे. अनिकेतच्या कुटुंबियांचा आत्महत्येचा प्रयत्न करत ही मागणी केली आहे. पोलीस स्टेशन चौकात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. दोन भाऊ, आई आणि अनिकेतच्या पत्नीनं आत्महत्येचा प्रयत्न केला.
सांगली पोलीस स्टेशनच्या आवारात या दोघांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतलं. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अनिकेत कोथळे खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा या मागणीसाठी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. आशिष कोथळे आणि अमित कोथळे अशी या दोघांची नाव आहेत.
मंगळवारी सकाळी अनिकेतचे दोन्ही भाऊ तपासाबद्दल विचारणा करायला पोलीस स्टेशनमध्ये गेले होते पण पोलिसांनी योग्य उत्तर न दिल्याने त्यांचा उद्रेक होऊन त्या दोघांनी अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतलं आहे.
सांगली पोलीस ठाण्याच्या कोठडीत पोलिसांच्या मारहाणीत लूटमारीच्या गुन्ह्यातील अनिकेत कोथळे या संशयिताचा मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांनी सराईत गुन्हेगाराप्रमाणे त्यास नग्न करुन उलटे टांगले व मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याप्रकरणी सर्व पोलिसांना अटक करून सेवेतून बडतर्फ केले आहे. हा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे.