मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड पदांसाठी झालेल्या परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाल्याने या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. तसेच या परीक्षा येत्या काही महिन्यात 'TCS'किंवा 'MKCL' या संस्थांमार्फत घेण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील 2739 आणि गट ड संवर्गातील 3466 अशा एकूण 6205 पदांच्या भरतीसाठी सरळसेवा परीक्षा झाल्या होत्या. परंतू परीक्षांमध्ये झालेला गोंधळ पाहता ही भरती प्रक्रीया रखडली आहे.
या परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार होत्या परंतू नियोजित तारखेच्या काही तास आधीच ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. नंतर ऑक्टोबरमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. या दोन्ही परीक्षांचे पेपर आधीच फुटल्याचे पोलिसांच्या तपासाअंती स्पष्ट झाले.
परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल़्यानंतरही आरोग्य विभाग ठोस निर्णय घेत नसल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यामुळे या दोन्ही संवर्गाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. या दोन्ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार आहे.