'येवले चहा आरोग्यास धोकादायक, मसाल्यात कृत्रिम रंग'

चहाच्या व्यवसायाला ग्लॅमर मिळवून दिलेल्या येवले चहावर एफडीएने कारवाई केली आहे.  

Updated: Jan 23, 2020, 07:35 PM IST
'येवले चहा आरोग्यास धोकादायक, मसाल्यात कृत्रिम रंग' title=
संग्रहित छाया

पुणे : राज्यात चहाच्या व्यवसायाला ग्लॅमर मिळवून दिलेल्या येवले चहावर एफडीएने कारवाई केली आहे. येवले चहाच्या मसाल्यात आरोग्यास घातक ठरणारा कृत्रिम रंग आढळून आला आहे. त्यामुळे येवले चहावर खटला दाखल करण्यात येणार आहे. चहा मसाल्यात कृत्रिम रंग वापरण्यात आल्याची माहिती एफडीए अधिकाऱ्यांनी दिली आहे. याबाबत म्हैसूरमधील प्रयोगशाळेचा धक्कादायक अहवाल पुढे आला आहे. 

पुण्यातील सुप्रसिद्ध येवले चहाच्या मसाल्यात भेसळ झाल्याचे उघड झाले आहे. मसाल्यात tartrazin चा अंश आढळून आला आहे. म्हैसूरमधील प्रयोगशाळेचा धक्कादायक अहवाल पुढे आला आहे. येवले चहा संदर्भातील या अहवालामुळे पुण्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. चहाला आकर्षक रंग यावा यासाठी tartrazin  चा वापर केला जातो. मात्र हे tartrazin कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला आमंत्रण देणारं ठरू शकते. त्यामुळे अन्नपदार्थात त्याच्या वापरास बंदी आहे, असं असताना एफडीएने केलेल्या कारवाईत येवले चहाच्या मसाल्यात ही धोकादायक भेसळ आढळून आली आहे. 

येवले चहाच्या आजघडीला राज्यात २१८ शाखा आहेत. येवले चहावर यापूर्वीही विविध कारणांनी कारवाई करण्यात आली. मात्र ही कारवाई चुकीची असल्याचा दावा येवले चहाच्या मालकांकडून करण्यात आला आहे. येवले चहाचे मालक नवनाथ येवले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

येवले चहा सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. ग्राहकांमध्ये तो अल्पवधीत लोकप्रिय ठरला. असे असताना एफडीकडून कारवाई करण्यात आल्याने या चहाच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. येवले चहा एकदा पिऊन पाहा अशी त्यांची टॅगलाईन आहे. यापुढे मात्र येवले चहा प्यायचा कि नाही याचा विचार ग्राहकांना करावा लागणार आहे.