परभणी : पाथरीच्या साई जन्मस्थळाचा वाद आता उच्च न्यायालयात जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ न दिल्याने उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती पाथरी साई जन्मस्थळ कृती समितीचे अध्यक्ष बाबाजानी दुर्रानी यांनी दिली. येत्या सोमवारी औरंगाबाद खंडपीठात याबाबतची याचिका दाखल केली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तर ज्यांना न्यायालयात जायचे आहे, त्यांनी जावे. पाथरीचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास करण्याची सरकारची भूमिका आहे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
साईबाबांच्या जन्मस्थळावरून वाद सुरू आहे. साईबाबा पाथरीचे असल्याचा पाथरीकरांचा दावा आहे,यावरून शिर्डी येथील भाविकांनी साईबाबांची जन्मभूमी म्हणून १०० कोटी मुख्यमंत्र्यांनी पाथरीला दिल्यावरून कडकडीत बंद पाळला होता. त्यानंतर शिर्डीकरांना मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात बोलवून जन्मभूमी हा शब्द काढून पाथरीला १०० कोटी रुपये देऊ असा शब्द दिला. त्यानंतर शिर्डीतले आंदोलन तर थांबले पण पाथरीकर आक्रमक झाले आहेत.
Breaking news । पाथरी - साईंच्या जन्माचा वाद आता उच्च न्यायालयात । मुख्यमंत्र्यांनी बाजू मांडण्यासाठी वेळ न दिल्याने निर्णय । कृती समितीचे अध्यक्ष बाबाजानी दुर्रानी यांची माहिती । सोमवारी दाखल करणार याचिका । साईंच्या जन्माचा वाद आता न्यायालय सोडवणारhttps://t.co/HOK58cBO5u pic.twitter.com/NGyqhPgP0A
— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 23, 2020
साईभूमी हेच आमच्या अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय असून आम्हालाही मुख्यमंत्र्यांनी आपली बाजू मांडण्यासाठी वेळ द्यावा. अशी मागणी केली. पाथरीच्या शिष्टमंडळाला भेटीची वेळ मिळावी म्हणून परभणीचे खासदार संजय जाधव काल मुख्यमंत्र्यांकडे गेले होते. पण मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द फिरवून साई जन्मभूमीच्या वादावर पडदा टाका, असे खासदारांना सांगितले. तीर्थक्षेत्र म्हणून विकास करा निधी लागल्यास परत देऊ, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले असताना खासदारांनी यावर आग्रह करीत कृती समिती नेमून साईंच्या जन्मभूमीचा वाद सोडवावा, अशी विनंती केली. मात्र, त्याला ही मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली नाही. त्यामुळे पाथरीकरांनी उच्च न्यायालयात जायचा निर्णय घेतला आहे, साईबाबा जन्मभूमी, कृती समितीचे अध्यक्ष बाबाजानी दुर्रानी यांनी सांगितले.