धक्कादायक ! पालिकेच्या शाळेत आसाराम बापूचे उदात्तीकरण

 नाशिक महापालिकेच्या शाळेत आसाराम बापूचे उदात्तीकरण

Updated: Feb 12, 2020, 08:06 PM IST
धक्कादायक ! पालिकेच्या शाळेत आसाराम बापूचे उदात्तीकरण title=
संग्रहित छाया

योगेश खरे, नाशिक : महापालिकेच्या शाळेत आसाराम बापूचे उदात्तीकरण करण्यात येत आहे. आसाराम बापूनं लैंगिक अत्याचार केले नसल्याची पत्रकं विद्यार्थ्यांना वाटली गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. लैंगिक अत्याचारप्रकरणी तिहार तुरूंगात बंद असलेल्या आसाराम बापूच्या उदात्तीकरणाचा घाट घालण्यासाठी चक्क शाळांचा वापर होत असल्याचे या निमित्ताने उघड झाले आहे. विशेष म्हणजे शाळेतल्या मुलांवर आसाराम निर्दोष असल्याचे ठसवण्याचा प्रकार करण्यात आला आहे. नाशिक मनपा शाळेत हा प्रकार घडल्यामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. पालकवर्गांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

नाशिक मनपा शाळेतल्या मुलांच्या हाती आसाराम बापूची पत्रकं पाहून कोणालाही धक्का बसेल. मातृपितृ पूजन या आसारामच्या कार्यक्रमातून भक्तमंडळी आसारामचे उदात्तीकरण करत असल्याचं उघड झाले आहे. सातपूरच्या अशोकनगर इथल्या नाशिक मनपाच्या बी. डी. भालेकर शाळेत हा प्रकार घडला. आसाराम बापूने लैंगिक अत्याचार केले नाहीत. आसाराम निर्दोष आहे, अशी पत्रके विद्यार्थ्यांना वाटण्यात आली. मात्र सर्वच शाळांत हे प्रकार सुरू असल्याने आपल्या शाळेतही हा प्रकार होऊ दिला असे सांगत शिक्षकांनी याची भलामण केलीय. 

विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना तासभर थांबवण्यात आले होते. त्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 'झी २४ तास'ने याची दखल घेत बातमी प्रक्षेपित केल्यावर नाशिकच्या मनपा आयुक्तांनी आणि महापौरांनी तातडीने चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. तशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली. 

नाशिकमध्ये गंगापूर रोडवर आसारामचा आश्रम होता. गंगापूर धरणाजवळ त्याचं वादग्रस्त खासगी फार्म हाऊसही होते. आसाराम बापूला न्यायालयाने दोषी ठरवून कारागृहात डांबला आहे. असे असताना त्याच्या भक्तांनी हा प्रकार केला आहे. एवढंच नाही तर त्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीला धरल्याने हा संतापजनक प्रकार तातडीने थांबविण्याची मागणी होत आहे.