Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल होतात. तर, वारकरी आषाढी वारीत सहभागी होत विठुरायाच्या दर्शनासाठी पोहोचतात. कित्येक दिवस चालून वारकरी पंढरपुरात दाखल होतात. वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक नवी योजना राबवली आहे. राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना व सोयीसुविधा पुरवण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने जारी केला आहे.
महिन्याभराची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना महामंडळाच्या माध्यमातून वृद्धापकाळात वारकरी पेन्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. आषाढी व कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा, विमा संरक्षण कवच देण्यात येणार आहे. त्याचबरोबर, कीर्तनकारांसाठी आरोग्य विमा, मानधन सन्मान योजना राबवण्यात येणार आहे. महामंडळाच्या योजनेतून, सर्व पालखी मार्गाची सुधारणा, स्वच्छता, आरोग्य, निवारा व सुविधा यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करुन नियोजन करण्यात येणार आहे.
राज्यात वारकरी मंडळ स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. या महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असणार आहेत. या महामंडळाला 50 कोटींचे भागभांडवल देण्यात येणार आहे. या मंडळाअंतर्गंत, पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर संस्थान, शेगाव, तारकेश्वर, भगवानगड, आगस्तऋषी, संत सावतामाळी समाज मंदिर, अरण व इतर तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यात येणार आहे. त्याचबरोबर, चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी व इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पंढरपूरचा दौरा केला. यावेळी त्यांनी आषाढी एकादशीनिमित्त काही सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला. प्रसारमाध्यमांशीदेखील त्यांनी संवाद साधला, आषाढी वारी आहे. सोयी सुविधा रस्ते या सर्वांचा एक आढावा घेण्यासाठी पंढरपूरला जात आहे. यावर्षी आम्ही वारकरी महामंडळ देखील स्थापन केलं आहे. त्या माध्यमातून वारकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी निर्णय घेतले जातील. प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला. टोलमुक्त वारी हे देखील केले. कुठे काहीही कमी न पडता या वर्षीची वारी चांगली व्हावी यासाठी सरकारचा प्रयत्न आहे.