सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसहीत महाराष्ट्रामध्ये दहीहंडी आयोजित करण्याला राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा छोट्या प्रमाणात उत्सवाला परवानगी द्यावी अशी मागणी दहिहंडी मंडळांनी केली होती. तसंच सर्व गोविंदांना लशीचे दोन डोस पूर्ण करणार आणि सुरक्षित दहीहंडी उत्सवाची जबाबदारी आमची असेल असं या बैठकीमध्ये समन्वय समितीने सरकारला सांगितलं.
पण दहीहंडी साजरी केल्याने जास्त मोठ्या प्रमाणावर करोनाचा प्रभाव वाढू शकतो असं टास्क फोर्सने सांगितलं असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे दहीहंडी आयोजित करण्याला राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे.
दरम्यान, या मुद्द्यावर आता विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. दोन डोस झालेल्या आणि प्रमाणपत्र असलेल्यांना पारंपारिक पद्धतीने दहीहंडीचा उत्सव करु द्या अशी मागणी भाजन नेते आशीष शेलार यांनी केली आहे. कमी गर्दीच्या आणि कमी उंचीच्या दहीहंडीला परवानगी दिली नाही तर सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही आशिष शेलार यांनी दिली आहे.
भाजप नेते आशिष शेलार हे दोन दिवसीय सोलापूर दौऱ्यावर असून भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.
चंद्रपूर इथं झालेल्या सामूहिक मारहाणीबद्दलही आशिष शेलार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीचा काळामध्ये लोकांचे जीव असुरक्षित असून सुरक्षा फक्त नेत्यांच्या मुलांची वाढली आहे. महिलावर, बालकांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. पोलिसांवर सरकारचा वचक नाहिए. पोलिसांच्या आपापसातील गटबाजीमुळे ते आतून पोखरून गेले आहेत, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सरकारने गांभीर्याने घेण्याची हात जोडून विनंती असं ते यावेळी बोलले.