जयेश जगड, झी मीडिया, अकोला : महाराष्ट्र सरकारने प्लास्टिक बंदीचा कायदा बनवला असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने याला हरताळ फासल्याचे समोर आले आहे. अकोल्यात राष्ट्रवादीच्या सभेत प्लास्टिक ग्लासचा सर्रास वापर करण्यात आला. संबधित नगरपालिकेने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन आयोजकांना चांगलाच दणका दिला आहे.
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे नऊ सप्टेंबरला राष्ट्रवादीचे उमेदवार रवी राठी यांच्या प्रचारासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. संत गाडगेबाबा विद्यालयातील प्रांगणात झालेल्या सभेत राष्ट्रवादीचे स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. येथे आलेल्या नागरिकांसाठी आयोजकांमार्फत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती.
मात्र आयोजकांची गल्लत इथेच झाली. पाणी पिण्यासाठी येथे प्लास्टिकचे ग्लास वापरण्यात आले. सभा संपल्यानंतर येथे प्लास्टिक ग्लासचा असा ढीग तयार झाला. मूर्तिजापूर नगरपालिकेने यासंदर्भात सभेच्या आयोजकांवर दहा हजाराचा दंड ठोठावला आहे. तर ही रक्कम लवकरच वसूल करण्यात येणार असल्याचे नगरपालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.