मुख्यमंत्र्याचे हॅलिकॉप्टर चिखलात रुतल्यानंतर भाजपाची पहिली प्रतिक्रिया

 मुख्यमंत्री आपल्या सर्व नियोजित सभा पूर्ण करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

Updated: Oct 11, 2019, 07:24 PM IST
मुख्यमंत्र्याचे हॅलिकॉप्टर चिखलात रुतल्यानंतर भाजपाची पहिली प्रतिक्रिया

पेण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर पेण येथील बोरगाव येथे लॅण्ड झाल्यावर हेलिपॅडवरील मातीत हेलिकॉप्टरची चाके रुतली. त्यामुळे पायलटचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले. मात्र प्रसंगावधान दाखवत पायलटने पुन्हा हेलिकॉप्टरवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठा अपघात टळला.  या अपघातानंतर एकच धावपळ उडाली. मात्र, मुख्यमंत्री सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यानी निवडणुकीची प्रचार घेतली आणि जोरदार भाषण केले. त्यांच्या चेहऱ्यावर अपघाताचे भाव दिसत नव्हते. यानंतर भाजपातर्फे प्रतिक्रिया देण्यात आली आहे. 

पेण येथे लँडिंग करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोडक्यात बचावले, अशा आशयाच्या बातम्या दाखविल्या जात आहेत. वस्तुत:  कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही असे भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे. लँडिंग करताना पायलट काळजी घेऊनच लँड करीत असतात. मुख्यमंत्री आपल्या सर्व नियोजित सभा पूर्ण करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्याच हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री उल्हासनगर येथे रवाना झाले आणि तेथील सभाही त्यांनी केल्याचे उपाध्ये यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवेवर, चुकीच्या माहितीवर कुणीही विश्वास ठेऊ नये असे आवाहन उपाध्ये यांनी केले आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथून सभा संपवल्यावर मुख्यमंत्री रायगड जिल्ह्यातील पेण येथे प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी आले होते. पाऊस पडल्याने जमीन ओली झाली होती. त्यामुळे पेण-बोरगाव येथील हेलिपॅड चिखलासारखे झाले होते. ४ वाजून २५ मिनिटे आणि ३० सेकंदानी पेण-बोरगाव येथे सात टन वजनाचे हेलिकॉप्टर लॅण्ड झाले. तेव्हा खाली चिखल असल्याने हॅलिकॉप्टरची चाके मातीत रुतल्याचे सांगितले जात आहे.