कोणत्याच पवारांशी संपर्कात नाही- एकनाथ खडसे

एकनाथ खडसे यांना भाजपाने उमेदवारी नाकारल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी

Updated: Oct 3, 2019, 03:47 PM IST
कोणत्याच पवारांशी संपर्कात नाही- एकनाथ खडसे  title=

मुक्ताईनगर : भाजपा नेते एकनाथ खडसे हे तीन महिन्यांपासून आपल्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते ठाण्यात आले होते. 'झी 24 तास'ने याबद्दल खडसे यांना विचारले असता त्यांनी हा दावा खोडून काढला. तीन महिन्यात काय तर गेल्या तीन वर्षात कोणत्याच पवारांशी आपला संबध नसल्याचा खुलासा एकनाथ खडसे यांनी केला आहे. कोणत्याच पवारांशी आपला संपर्क नसून अशा अफवांवर विश्वास ठेवू नका अशी माहिती खडसेंनी 'झी 24 तास'ला दिली आहे. 

एकनाथ खडसे यांना भाजपाने उमेदवारी नाकारल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. या पार्श्वभुमीवर खडसेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दरम्यान मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांची सभा घेतली. यावेळी खडसेंना उमेदवारी न दिल्यास मी राँकेल घेऊन स्वत:ला जाळून घेईन असे एका कार्यकर्त्याने खडसे यांना फोनवर सांगितले. पक्षाची शिस्त मोडू नका. पक्ष योग्य तो निर्णय घेईल असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. 

एकनाथ खडसे यांची पक्षनिष्ठा आज वेळोवेळी दिसून येत आहे, तेवढीच पक्षाकडून होणारी अवहेलनाही नजरेआड करता येत नाहीय. कारण भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. कोणताही गैरप्रकार होवू नये म्हणून खडसे घराबाहेर कार्यकर्त्यांच्या गराड्यात बसले आहेत. यावेळी एकनाथ खडसे यांनी आपल्याला तिकिट मिळणार नसल्याचे संकेत दिले आहेत, तरी देखील शांतता आणि संयम ठेवा असा सल्ला एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

दुसरीकडे आपल्याला तिकिट न मिळाल्यास आपली कन्या रोहिणी खडसे यांना तिकिट मिळाल्यास एकनाथ खडसे ते नाकारणार नाहीत, असं देखील संकेत एकनाथ खडसे यांच्या बोलण्यात दिसून येतात.

मात्र या सर्वात खडसे समर्थक मात्र आक्रमक होत आहेत. कारण उद्या दुपारपर्यंत अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. एकनाथ खडसे यांना तिकिटासाठी एवढी प्रतिक्षा करावी लागत असेल, तर एकनाथ खडसे यांनी अपक्ष निवडणूक लढवावी आणि विरोधकांना दाखवून द्यावं, असं आवाहन खडसेंना कार्यकर्ते करत आहेत.