close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

नांदेड रणसंग्राम : काँग्रेस बालेकिल्ल्यात शिवसेना, भाजपची मुसंडी; चव्हाणांची प्रतिष्ठापणाला

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड जिल्ह्यात विरोधकांनी काबीज करण्यावर भर दिलाय.

Updated: Aug 29, 2019, 05:35 PM IST
नांदेड रणसंग्राम : काँग्रेस बालेकिल्ल्यात शिवसेना, भाजपची मुसंडी; चव्हाणांची प्रतिष्ठापणाला

सतीश मोहिते, नांदेड : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड जिल्ह्यात शिवसेनेने मजल मारली आहे तर भाजपनेही चांगली कामगिरी केली आहे. दुसरीकडे वंचीत आघाडीचा चांगला प्रभाव नांदेड जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे. लोकसभेतील पराभवानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा आता विधानसभा निवडणुकीत पणाला आहे. नांदेडमध्ये कुणाची हवा आहे, याची चर्चा जोरदार सुरु आहे.

एकेकाळी शंकरराव चव्हाण घराण्याचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड जिल्ह्यातली सत्ता समीकरणे झपाट्याने बदलली आहेत. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजप आणि शिवसेनेनं चांगलीच मुसंडी मारली आहे. नांदेडमध्ये बदलाचे वारे वाहायला सुरुवात झाली २०१४च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ४ आमदार निवडून आले. काँग्रेसचे ३ तर भाजपा १ आणि राष्ट्रवादीचा १ आमदार निवडून आला. युतीच्या जागावाटपात नांदेडमधील ९ पैकी सात जागा शिवसेनेकडे आहेत. त्या सगळ्या जागा जिंकू असा विश्वास शिवसेनेला आहे.

लोकसभा जिंकल्यानंतर भाजपला नांदेडमधील विधानसभेच्या आणखी जागा हव्या आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या अशोक चव्हाणांच्या करिष्म्यावर काँग्रेस विसंबून आहे. स्वतः अशोक चव्हाण भोकरमधून लढण्याच्या तयारीत आहेत. मुस्लीम आणि दलित ऐक्य घडल्यास चमत्कार घडवेल असे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.

लोकसभेसारखं अशोक चव्हाणांना भोकरमध्ये अडकवून ठेवण्याची युतीची रणनिती आहे. तसे झाले तर सेना बाजी मारेल असे राजकीय विश्लेषकांना वाटत आहे. विधानसभा निवडणुकीत नांदेडमध्येच अशोक चव्हाणांना अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. त्यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणारी निवडणूक असणार अशी चर्चा आहे.