विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबाद शहरात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ५०० झाडं तोडण्यात येणार होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच झाड तोडण्यास मनाई केल्यानं हा विषय संपला. मात्र आता गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी झाडं तोडण्यात येणार असल्याचा नवा मुद्दा पुढे आलाय. या स्मारकासाठी तब्बल ११० झाडं तोडण्यात येणार आहेत. आता यालाही विरोध सुरु झालाय.
औरंगाबादच्या शासकीय दूध डेअरीचा भूखंड गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकासाठी देण्यात आला आहे. हे स्मारक बांधण्यासाठी ११० झाडं तोडावी लागणार आहेत. सिडकोनं तशी परवानगी महापालिकेला मागितली आहे. महापालिकेच्या वृक्ष समितीनं याला कडाडून विरोध केला आहे.
जो न्याय मुंबईतल्या मेट्रो कारशेडला, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला तोच मुंडेंच्या स्मारकाला असं महापौर नंदकुमार घोडेले यांचं म्हणणं आहे. मात्र एका तोडलेल्या झाडाच्या बदल्यात १० झाडं लावू. पण स्मारकाला विरोध नको, अशी भाजपची भूमिका आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी होणाऱ्या वृक्षतोडीवर अगदी अमृता फडणवीस यांनीही आक्षेप घेतला होता. आता भाजप नेत्याच्या स्मारकाचा मुद्दा आल्यावर भाजपचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेणार हे महत्त्वाचं आहे. पण झाडं महत्त्वाची की स्मारकं, याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे.