औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या स्वाभिमान सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्षल लागलं आहे. मुख्यमंत्र्यांचं संध्याकाळी सहा वाजता मुंबईहून औरंगाबाद विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर कारने ते औरंगाबादमधल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर दाखल होतील.
8 जून 1985 मध्ये शिवसेनेची मराठावाड्यातील पहिली शाखा सुरु झाली. याच शाखेच्या वर्धापन दिनानिमित्ताने उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. यासभेसाठी शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे. मुख्यमंत्र्यांची ही सभा रेकॉर्डब्रेक होणार, असा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे. यासभेसाठी विशेष काळजी घेतली जात आहे. मुख्यमंत्री वगळता सगळ्यांना कोरोनाचाचणी करायला लागणार असून रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच व्यासपीठावर प्रवेश दिला जाणार आहे.
स्टेजवर संभाजी महाराजांचा पुतळा
शिवसेनेच्या स्वाभिमान सभेआधीच आणखी एक चर्चा रंगली आहे. सभेसाठी उभारण्यात आलेल्या स्टेजवर संभाजी महाराजांचा भव्य पुतळा ठेवण्यात आला आहे. त्यामुळेया सभेत उद्धव ठाकरे औरंगाबादच्या नामांतराची घोषणा करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या मागणीवरुन भाजप आणि मनसेने अनेकवेळा शिवसेनेला डिवचलं आहे. त्यामुळे या सभेत मुख्यमंत्री घोषणा करणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. याशिवाय भाजप आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
'आमचेच विक्रम आज मोडणार'
कोरोनानंतर औरंगाबादमध्ये होणारी शिवसेनेची ही पहिली सभा आहे. या सभेत पक्षप्रमुख ठाकरी भाषेत सगळ्यांचा समाचार घेणार, ही सगळ्यांना मेजवानी असेल अशी माहिती शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिलीय. सभेसाठी खूप गर्दी होणार आहे, आम्ही बाहेर सुद्धा सभा पाहता येईल अशी सोय केली आहे, आम्ही आमचेच विक्रम आज मोडणार असं सुभाष देसाई यांनी सांगितलं.
औरंगाबाद शहराचे नाव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर केलं आहे. कागदोपत्री काही गोष्टी राहिल्या असून त्याही गोष्टी लवकरात लवकर पूर्ण होतील असा विश्वासही सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे.
सभेसाठी कडेकोट बंदोबस्त
सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सभेसाठी दीड हजार पोलिसांचे सुरक्षा कवच आहे. यामध्ये 5 डीसीपी, 7 एसीपी, 30 पीआय, 100 पीएसआय आणि 1200 पोलीस असणार आहे. तर एसरपीएफच्या तब्बल 2 तुकड्या याठिकाणी तैनात असतील.
सभेसाठी भाजपने डिवचलं
दरम्यान, या सभेआधी भाजपने शिवसेनेच्या या सभेविरोधात पोस्टरबाजी सुरु केली आहे. संभाजीनगर नामकरणाच्या आश्वासनाचा आज वर्धापन दिन आहे. 'उत्तर मागतोय संभाजीनगर' अशा पद्धतीने बॅनरबाजी करून भाजपने शिवसेनेला डिचवलं आहे.