Ayodhya Ram Mandir Nitesh Rane Slam Sanjay Raut: अयोध्येतील कार्यक्रम हा संपूर्ण देशाचा नसून भारतीय जनता पार्टीचा आहे. मला वाटतं प्रभू श्रीरामांना एकाप्रकारे किडनॅप करण्यात आलं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधल्यानंतर या प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या टीकेला भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणेंनी कठोर शब्दांमध्ये उत्तर देताना संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी प्रभू श्रीरामांबद्दल अशी भाषा वापरताना लाज वाटायला हवी होती असं नितेश राणे म्हणाले आहेत.
अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी होत असलेला राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून राऊत यांनी, अयोध्येतील हा बहुचर्चित कार्यक्रम संपूर्ण देशाचा नसून एका राजकीय पक्षाचा असल्याचं पत्रकारांशी बोलताना म्हटलं. उत्तर प्रदेशाबरोबरच केंद्रात भाजपचे सरकार असून त्यांनी एका पद्धतीने प्रभू श्रीरामाला किडनॅपच केलं आहे, असेही राऊत यांनी म्हटलं. "हे निमंत्रण म्हणजे नेमकं काय आहे? हा एका पक्षाचा कार्यक्रम आहे. भारतीय जनता पार्टीचा हा कार्यक्रम आहे. उत्तर प्रदेश आणि केंद्रामध्येही भाजपाचं सरकार आहे. मला वाटतं प्रभू श्रीरामांना एकाप्रकारे किडनॅप करण्यात आलं आहे. त्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही जाऊ रामलल्लांच्या दर्शनाला," अशा शब्दांमध्ये राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला.
"भाजपा पार्टी कोण आलीय रामलल्लाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण देणारी. देव स्वत: भक्तांना बोलावतो. भक्त हे देवाच्या दरबारात स्वत: जात असतात. भाजपाने आपला उत्सव आणि प्रचार रॅली तिथे करणार आहे. त्यात पावित्र्य कुठे आहे? भाजपचा हा राजकीय कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही अयोध्येला जाऊ. भाजपाच्या या कार्यक्रमाला जाण्यात आम्हाला रस नाही. राजकारण करणाऱ्यांचे ना रामाशी नाते आहे ना रामाच्या विचाराशी नाते आहे. हा कार्यक्रम म्हणजे चुनावी जुमला आहे. त्यांना करायचे ते करू द्या," असं म्हणत राऊतांनी भाजपावर टीका केली.
राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना नितेश राणेंनी प्रभूरामांबद्दल असे शब्द वापरताना लाज वाटायला हवी होती असं म्हटलं आहे. "प्रभू श्रीरामांबद्दल बोलताना किडनॅप वगैरे अशी खालच्या दर्जाची भाषा वापरल्याबद्दल लाज वाटली पाहिजे. आमच्या देवाला कोणीही किडनॅप करु शकत नाही. त्याच्याकडे कोणीही वाकड्या नजरेनं पाहू शकत नाही. 500 वर्षांपासून जी इच्छा होती ती पूर्ण करण्यासाठी मेहनत केली आहे. याच्यासारख्या मुल्ला लोकांना या गोष्टी कळणार नाहीत," अशा शब्दांमध्ये नितेश राणेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊतांवर टीका केली.
उद्धव ठाकरेंना निमंत्रण न पाठवल्याच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलेलं असताना यावरुनही नितेश राणेंनी संजय राऊतांना 'गजनी' असं म्हटलं आहे. "गजनी झालेल्या संजय राऊतांना आठवण करुन द्यावी की मेट्रोचं आमंत्रण असेल किंवा बाळासाहेबांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचं आमंत्रण असेल हे त्यावेळीचे विरोधीपक्ष नेता असलेल्या देवेंद्र फडणवीसांना दिलं नव्हतं. मुख्यमंत्री पद तुमच्याकडे असताना त्यांना त्यावेळी का डावललं?" असा प्रश्न नितेश राणेंनी राऊतांनी विचारला आहे.