IND VS AUS 4th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 5 सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) टेस्ट सीरिज सुरु असून यातील चौथा सामना 26 ते 30 डिसेंबर दरम्यान मेलबर्न येथे पार पडला. या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा 184 धावांनी पराभव झाला असून ऑस्ट्रेलियाने सीरिजमध्ये 1-2 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने चौथा टेस्ट सामना गमावल्यामुळे आता भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याचं समीकरण कसं असणार याविषयी जाणून घेऊयात.
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर 26 ते 30 डिसेंबर दरम्यान चौथा टेस्ट सामना खेळवला गेला. यात ऑस्ट्रेलियाने शेवटच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 340 धावांचे आव्हान दिले होते. मात्र हे आव्हान पूर्ण करणं टीम इंडियाच्या फलंदाजांना शक्य झालं नाही. टीम इंडियाकडून केवळ यशस्वी जयस्वालने 84 धावांची कामगिरी केली तर ऋषभ पंत 30 धावा करून बाद झाला. तर इतर कोणत्याही फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या सुद्धा करता आली नाही. 340 धावांचं लक्ष असताना टीम इंडिया केवळ 155 धावा करून ऑल आउट झाली. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक प्रत्येकी ३ विकेट्स या पॅट कमिन्स आणि बोलँड, नॅथन लिऑनने २, तर ट्रेव्हिस हेड, मिचेल स्टार्कने प्रत्येकी एक विकेट घेतली.
टीम इंडियाला 2025 च्या जून महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी मेलबर्न आणि सिडनी येथील दोन्ही सामने जिंकणं अतिशय महत्वाचं होतं. असं झाल्यास टीम इंडिया कोणावरही अवलंबून न राहता WTC फायनलमध्ये पोहोचली असती. परंतू आता टीम इंडियाने मेलबर्न टेस्ट गमावल्यामुळे तसं होणं शक्य नाही. मेलबर्न टेस्टमध्ये पराभूत झाल्याने WTC पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया तिसऱ्याच स्थानी आहे, परंतु त्यांची विजयाची टक्केवारी 55.88 वरून 52.78 पर्यंत कमी झाली आहे. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्या विजयाची टक्केवारी 61.46 इतकी आहे. तर पहिल्या क्रमांकावर असणारी साऊथ आफ्रिका ही यापूर्वीच WTC फायनलसाठी क्वालिफाय झालीये. परंतु असं असलं तरी टीम इंडिया WTC फायनलच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडलेली नाही. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी श्रीलंकेवर अवलंबून राहावे लागेल आणि श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला दोन सामन्यांच्या मालिकेत पराभूत करावे यासाठी प्रार्थना करावी लागेल.
हेही वाचा : ऋषभ पंतला मूर्ख का म्हणालात? सुनील गावसकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'त्याचा अहंकार इतका...'
मेलबर्न टेस्ट गमावल्यामुळे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी टेस्ट सीरिज सध्या 1-2 अशा बरोबरीत आहे. सिडनी येथे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी टेस्ट सीरिजचा शेवटचा सामना हा 3 ते 7 जानेवारी रोजी होणार आहे. तेव्हा सिडनी टेस्ट सामना टीम इंडियाला काहीही करून जिंकावा लागेल असे झाल्यास बॉर्डर गावसकर टेस्ट सीरिज 2-2 अशा बरोबरीत येईल आणि WTC पॉईंट्स टेबलमध्ये भारताच्या विजयाची टक्केवारी 55.26% पर्यंत पोहोचू शकले.