Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहाचे काम पूर्णत्वास आले असून येत्या 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठपणा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे अयोध्येला जाण्यासाठी रामभक्त आतुर आहेत. अशातच रामभक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अयोध्याला जाणाऱ्या रामभक्तांसाठी रेल्वे प्रशासनाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
अयोध्येला जाण्यासाठी रेल्वे गाड्या सोडा, अशी मागणी प्रवाशांकडून वारंवार करण्यात येत होती. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची मागणी पूर्ण केली असून पुण्यातून 30 जानेवारीपासून अयोध्येसाठी 15 विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहे. दोन दिवसाला एक गाडी पुण्यातून अयोध्यासाठी सुटणार आहे. त्यामुळे अयोध्याला जाणाऱ्या रामभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. या सर्व गाड्या स्लीपर कोच असतील. त्यासाठी प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पुणे अयोध्या पुणे रेल्वे सेवेसाठी तीन रेक वापरण्याची शक्यता आहे. अयोध्येहून पुण्यासाठी 15 विशेष गाड्याही सोडण्यात येणार आहेत. एका गाडीमधून साधारण दीड हजार प्रवासी अयोध्याला जाऊ शकणार आहेत.
या गाड्यांचे बुकिंग लवकरच सुरू होणार आहे. गाड्यांना मिळालेला प्रतिसाद पाहून विशेष गाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल. तसेच कोल्हापूरहून अयोध्येसाठी विशेष ट्रेन सोडण्याबाबतही चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पण, कोल्हापूर ते अयोध्येला गाडी सुरू झाल्यास पुण्यतील प्रवाशांना आणखी एक गाडी मिळण्याची शक्यता आहे.
अयोध्येत रामललाला मंदिरात विराजमान करण्याची तयारी सुरू झाली आहे. आज 18 जानेवारी 2024 हा राम मंदिर विधींचा तिसरा दिवस आहे. 22 जानेवारीला रामनगरीच्या नव्याने बांधलेल्या मंदिरात रामललाच्या मूर्तीचा अभिषेक केला जाणार असून, आजच रामलला गर्भगृहात प्रवेश करणार आहेत. यासोबतच आज राम मंदिरात जलाधिवास-गंगाधिवास होणार आहे.
22 जानेवारी रोजी अभिषेक सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संघप्रमुख मोहन भागवत आणि ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास गर्भगृहात उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांच्या भाषणानंतर सर्व पाहुण्यांना एक एक करून रामलल्लाचे दर्शन दिले जाईल. 50 देशांतील केवळ 53 प्रतिनिधी अभिषेकमध्ये सहभागी होतील. सर्व आध्यात्मिक-धार्मिक परंपरांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.