Baba Siddique Murder Uddhav Thackeray Shivsena Reacts: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री वांद्रे येथे आमदार लेकाच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण तापलेलं असतानाच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तसेच देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख 'शेणापती' असा करत ठाकरेंच्या पक्षाने सिद्दीकींच्या हत्येवरुन राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.
"महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचे साफ धिंडवडे निघाले आहेत. खून, खंडणी, भ्रष्टाचार आणि महिलांवरील अत्याचार यामुळे महाराष्ट्र बदनाम झाला आहे. माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री भरगर्दीत पोलीस बंदोबस्तात हत्या झाली. मुंबई शहर या खुनामुळे हादरले आहे. सगळ्यांच्याच मनात आपण असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री मिंधे व त्यांच्या सरकारने ज्या पद्धतीचा भ्रष्ट आणि बेलगाम कारभार चालविला आहे तो पाहता सगळ्यांनाच जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. बाबा सिद्दिकी यांच्या निर्घृण हत्येने अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. राज्यात सरकार अस्तित्वात नाही. सरकार म्हणजे काय? एखादी गुंडांची किंवा खंडणीखोरांची टोळी चालवावी त्या पद्धतीने सरकार चालवले जात आहे व या टोळीस मदत करतील अशाच पोलीस अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जागी नेमले जात आहे," असा घाणाघात 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
"मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. देशाचे महत्त्वाचे आर्थिक केंद्र आहे. पंतप्रधान व देशाच्या गृहमंत्र्यांची मुंबईत सतत ये-जा सुरू असते. मुख्य म्हणजे मिंधे-फडणवीस सरकारने मुंबईला दोन-दोन पोलीस आयुक्त नेमले आहेत तरीही जनतेची सुरक्षा वाऱ्यावर आहे व दिवसाढवळ्या रस्त्यांवर मुडदे पाडले जात आहेत. मागच्या चार दिवसांत मुंबईत 17 हत्या झाल्या. इतर गुन्ह्यांचा तपशील आम्ही देत नाही, पण मुंबई शहर हत्या व खंडण्यांनी हादरले आहे. हे हादरे मुख्यमंत्र्यांना बसत नाहीत. इतका निर्ढावलेपणा त्यांच्यात दिसत आहे. बदलापूरच्या बलात्कार कांडातील आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर पोलिसांनी केले. त्यानंतर मुख्यमंत्री मिंधे व गृहमंत्री फडणवीस यांनी स्वतःला ‘सिंघम’ म्हणून घोषित केले. त्या दोन्ही सिंघमची ऐशी की तैशी करत गुंडांनी मुंबईचा ताबा घेतला आहे," असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लागवला आहे.
"बाबा सिद्दिकी हे राज्याचे मंत्री होते. राजकारणात, समाजकारणात त्यांचे स्थान होते. सिनेक्षेत्रातील अनेकांशी ते संबंधित होते. सलमान खान, शाहरुख खान यांच्याशी त्यांची विशेष जवळीक होती. कोणी एक लॉरेन्स बिष्णोई गँग सलमान खानच्या जिवावर उठली आहे. सलमान खानला ठार करण्याच्या धमक्या या गँगकडून येत आहेत. मधल्या काळात सलमानच्या घरावर गोळीबारही झाला होता. आता बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी याच गँगने घेतली. बाबा सिद्दिकी हे सलमान खानचे मित्र असल्याने लॉरेन्स बिष्णोई गँगने ही हत्या केल्याचे समोर आले. सलमान खानचे अनेक मित्र आहेत. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक हे सलमानबरोबर काम करतात. मग आता या सगळ्यांच्याच जिवाला धोका निर्माण झाला आहे, असे समजायचे काय?" असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं उपस्थित केला आहे.
"पोलिसांना मिळालेले हे आव्हान आहे. अनेक वर्षे नगरसेवक, आमदार व मंत्रीपदी राहिलेली व्यक्ती एका सिनेअभिनेत्याशी त्याची मैत्री आहे म्हणून मारली जात असेल तर ते मिंधे सरकारचे अपयश आहे. पोलीस यंत्रणा राजकीय वाळवीने व भ्रष्टाचाराने पोखरली आहे. मुंबई-ठाण्यातील 75 टक्के पोलीस बळ हे गद्दार आमदार, खासदार व त्यांच्या समर्थकांच्या सुरक्षेसाठी लावले गेले आहे. त्यामुळे मुंबईचे व राज्याच्या सुरक्षेचे धोतर सुटले आहे. अडीच वर्षांत मुंबई-पुण्यासारख्या शहरांत गुंड टोळ्या फोफावल्या आहेत. पुण्यात खून, बलात्कार, नशेबाजीचा कहर झाला आहे. भररस्त्यात कोयत्याने व बंदुकांनी हत्या होतात. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक, शैक्षणिक राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे, मात्र आज तेथे खून, खंडण्या, बलात्कार, कोयता गँग यांचा हैदोस सुरू आहे. नागपुरातही वेगळे काही घडताना दिसत नाही. मुंबईत तर ‘गँगवॉर’चा काळ पुन्हा अवतरला आहे. कारण मुख्यमंत्री मिंधे यांनी त्यांच्या राजकारणासाठी त्यांच्या अनेक ‘राम-रहिम’ना मोकळे सोडले आहे. ज्या राज्याचा राजाच गुंडांचा ‘शेणापती’ म्हणून काम करतो ते राज्य सुरक्षित व सुसंस्कृत कसे राहणार?" असा सवाल उपस्थित करत ठाकरेंच्या पक्षाने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
"गुंड टोळ्यांचे गॉडफादर म्हणून राज्याचा कारभार चालवला जातोय. भ्रष्टाचारातून मिळालेल्या पैशांतून ही राज्यव्यापी गुंडगिरी पोसली जात आहे व त्याच गुंडांचा वापर करून निवडणुका लढवल्या जात आहेत. महाराष्ट्राच्या इभ्रतीला काळिमा फासणारे हे प्रकार आहेत. महाराष्ट्र राज्याचा लौकिक उत्तम प्रशासन व कायदा-सुव्यवस्थेबाबत होता. आज त्या लौकिकाचा मनोरा कोसळून पडला आहे. मुख्यमंत्री मिंधे यांनी आधी पोलीस खात्याचे गुन्हेगारीकरण केले, त्याच गुन्हेगारांना बळ देऊन राजकारण सुरू केले. आता संपूर्ण मुंबई, महाराष्ट्रावर गुन्हेगारांचे राज्य सुरू झाले. गृहमंत्री अमित शहा यांना या स्थित्यंतराचा सर्वाधिक आनंद झाला असेल. त्यांना हवे तसेच मुंबईत घडत आहे. गुंडांच्या शेणापतीस महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याच्या सत्तेवर बसवून शहा यांनी महाराष्ट्रावर सूड उगवला आहे. आता काय करायचे?" असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.