'यार तेरा गँगस्टर...', बाबा सिद्धिकी यांच्या मारेकऱ्याने ठेवली होती Instagram पोस्ट, म्हणतो , 'सभ्य बाप...'

Baba Siddique Murder: आरोपी फोटोमध्ये बाईकला टेकून उभा असल्याचं दिसत आहे. 'यार तेरा गँगस्टर है जानी,' अशी कॅप्शन त्याने फोटोला दिली होती. 24 जुलै त्याने ही पोस्ट शेअर केली होती.   

शिवराज यादव | Updated: Oct 14, 2024, 06:01 PM IST
'यार तेरा गँगस्टर...', बाबा सिद्धिकी यांच्या मारेकऱ्याने ठेवली होती Instagram पोस्ट, म्हणतो , 'सभ्य बाप...' title=

Baba Siddique Murder: राष्ट्रवादी पक्षाचे नेते बाबा सिद्धिकी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. त्यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, एकजण अद्याप फरार आहे. यामधील आरोपी शिव कुमार याने तीन महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामला एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमधील फोटोत त्याने शर्ट आणि जीन्स घातली असून एका बाईकला टेकून उभा असल्याचं दिसत आहे. 24 जुलैला पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोला त्याने 'यार तेरा गँगस्टर है जानी' अशी कॅप्शन त्याने दिली आहे. 

तसंच याआधी करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये त्याने, 'सभ्य बाप आहे, आम्ही नाही' (Sharif baap hai, hum nahin) अशी कॅप्शन दिली आहे. 

त्याच्या एका पोस्टमध्ये मुंबईच्या स्कायलाईनचा एक संक्षिप्त व्हिडिओ असून त्याला 'KGF' मधील म्युझिक आणि "शक्तिशाली लोक ठिकाणे शक्तिशाली बनवतात" हा डायलॉग वापरण्यात आला आहे. 4 ऑगस्टला त्याने शेवटची पोस्ट केली होती. 

शनिवारी रात्री वांद्रे येथे माजी मंत्री बाबा सिद्दिकींवर अनेक गोळ्या झाडणाऱ्या तीन हल्लेखोरांपैकी कुमार एक आहे. त्याचे साथीदार गुरमेल बलजित सिंग आणि धर्मराज राजेश कश्यप यांना गुन्ह्याच्या रात्रीच अटक करण्यात आली होती, मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकुमार वांद्रेहून रिक्षाने कुर्ला स्टेशनवर पोहोचला. त्यानंतर त्याने हार्बर मार्गावर ट्रेन पकडली आणि कुर्ल्याहून पनवेल स्थानक गाठव्याचं तपासात समोर आलं आहे. तो अखेरचा पनवेलमध्ये दिसला होता आणि पनवेलहून एक्स्प्रेसने राज्यातून निघून गेला असा पोलिसांना संशय आहे.

या प्रकरणातील तीन कथित शूटर्सपैकी दोघे कुमार आणि कश्यप उत्तर प्रदेशातील बहराईचमधील गंडारा गावातील आहेत. गरीब कुटुंबातील दोघेही होळीनंतर पैसे कमवण्यासाठी त्यांच्या गावातून पुण्याला आले होते. तिसरा आरोपी सिंग हा हरियाणाचा आहे.

गंडारा गावातील स्थानिक आणि पोलिसांनी सांगितलं की कुमारचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नव्हता. त्यांनी सांगितले की, तो पुण्यातील एका भंगाराच्या दुकानात कामाला गेला होता. आपला मुलगा हत्येमध्ये सामील असल्याच्या पोलिसांच्या दाव्यावर कुमारची आई सुमन यांनी अविश्वास व्यक्त केला आहे. 

मुंबईतील वांद्रे भागातील खेर नगरमध्ये बाबा सिद्धिकी आपला मुलगा झीशान सिद्दीकीच्या कार्यालयाबाहेर असताना तिघांनी दसऱ्याच्या फटाक्यांच्या आवाजाचा फायदा घेत गोळीबार केला. सूत्रांच्या माहितीनुसार, तिघांनी सिद्दिकी यांची सुरक्षा करणाऱ्या पोलीस हवालदारावर मिरची पावडर फेकली. बाबा सिद्धिकी यांना लिलावती रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण त्यांना मृत घोषित करण्यात आलं. 

रविवारी सायंकाळी पुण्यातून 25 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितलं की, अटक केलेला प्रवीण लोणकर हा कटात सहभागी होता आणि ते त्याचा भाऊ शुभम लोणकरच्या शोधात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम लोणकर याने सोशल मीडियावर पोस्ट केली की लॉरेन्स बिश्नोई टोळीने हत्येची जबाबदारी घेतली आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना त्याचा भाऊ प्रवीण याने पुण्यात आश्रय दिला.